शासकीय शाळांमध्ये क्रीडा संस्कृतीस चालना: मनपास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

कोल्हापूर - शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम जागवण्यासाठी आणि बुद्धिबळासारख्या मानसिक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेने विशेष पुढाकार घेतला आहे. 14, 17 व 19 वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी मनपास्तरीय बुद्धिबळ निवड स्पर्धा काल सेंट झेवियर्स हायस्कूल येथे दिमाखात सुरू झाली. या स्पर्धेचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते झाले. उद्घाटनाच्या वेळी आयुक्तांनी कोल्हापूरच्या समृद्ध क्रीडा परंपरेचा उल्लेख करत, मनपास्तरीय खेळांचा दर्जा वाढवण्यासाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
"कोल्हापूरची क्रीडा परंपरा खूप मोठी आहे. 50 विविध खेळांच्या शासकीय शालेय मनपास्तरीय स्पर्धा महानगरपालिका दरवर्षी आयोजित करते. खेळांमध्ये दर्जा आणण्यासाठी व सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत," असे आयुक्त के. मंजूलक्ष्मी म्हणाल्या.
चौदा वर्षाखालील मुला मुलींच्या गटात कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शाळेमधून मुलांच्या गटात एकशे चौऱ्यांशी तर मुलींच्या गटात छप्पन असे एकूण 240 बुद्धिबळपटू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत मुलांच्या गटात स्विस् लीग पद्धतीने एकूण आठ फेऱ्या होणार आहेत तर मुलींच्या गटात एकूण सहा फेऱ्या होणार आहेत. चौथ्या फेरीनंतर मुलांच्या गटात अर्णव पोर्लेकर, प्रथमेश व्यापारी, सर्वेश पोतदार, अर्णव पाटील, अन्वय भिवरे, अर्णव र्हाटवळ, वेदांत देसाई व ऋग्वेद पाटील हे आठ जण चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत. अग्रमानांकित आरव पाटील व आदित्य घाटे यांच्यासह चाळीस जण तीन गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत. मुलींच्या गटात चौथ्या फेरीनंतर हर्षदा सूर्यवंशी पाटील, आरोही सायेकर व आराध्या सावंत या तिघीजणी चार गुणासह संयुक्तपणे आघाडीवर आहेत तर शरयू शिंदे व राणी कोळी या दोघी साडेतीन गुणांसह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.