कोल्हापुरात राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्यासाठी खासदार शाहू छत्रपतींची मागणी

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील फुटबॉलचा वाढता प्रसार, शंभर वर्षांची परंपरा आणि हजारो खेळाडूंचा सहभाग लक्षात घेता येथे राष्ट्रीय फुटबॉल अकादमी सुरू करण्याची मागणी खासदार शाहू छत्रपती यांनी केंद्रीय क्रीडामंत्री मनसुख मांडावीय यांच्याकडे केली आहे. खासदार शाहू छत्रपती यांनी क्रीडा मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात कोल्हापूरच्या समृद्ध फुटबॉल परंपरेचा आढावा घेतला असून, शहरात सध्या 128 नोंदणीकृत संघ, 2680 पेक्षा जास्त खेळांडू, आणि सहा महिला संघ कार्यरत असल्याचे नमूद केले आहे.
✅कोल्हापूरची फुटबॉल परंपरा -
कलकत्ता, गोवा, केरळ नंतरचे कोल्हापूर हे चौथे महत्त्वाचे फुटबॉल केंद्र आहे. 1940 मध्ये छत्रपती राजाराम महाराज व मेजर जनरल छत्रपती शहाजी महाराज यांच्या प्रेरणेतून ‘कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन’ची स्थापना झाली. ही संस्था AIFF व वेस्टर्न महाराष्ट्र फुटबॉल असोसिएशनशी संलग्न आहे. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या KSA लीग स्पर्धांमध्ये सुमारे 2500 खेळाडू सहभाग घेतात. या मैदानावर आतापर्यंत आय लीग, संतोष ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय महिला सामन्यांचाही यशस्वी आयोजन झाले आहे.
✅राष्ट्रीय अकादमीची गरज का? -
फुटबॉलची चळवळ असूनही, कोल्हापुरात अद्यापही शासकीय स्तरावर फुटबॉलचे तांत्रिक प्रशिक्षण देणारी एकही संस्था नाही. परिणामी, स्थानिक पातळीवर खेळांडू घडत असले तरी त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास खुंटतो. खासदार शाहू छत्रपती यांनी बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या धर्तीवर कोल्हापुरातही फीफा व AIFF च्या सहकार्याने राष्ट्रीय फुटबॉल अकादमी स्थापन करावी, अशी मागणी केली आहे.
✅कोल्हापूर – सुविधा व संभाव्यता -
कोल्हापूर हे विमान, रेल्वे व रस्ते अशा सर्व प्रकारच्या दळणवळणाने सज्ज शहर असून येथे पाच थ्री स्टार व एक फाईव्ह स्टार हॉटेलही आहेत. त्यामुळे देश-विदेशातील स्पर्धा घेण्यासाठी हे शहर आदर्श ठरू शकते.
✅फुटबॉलचा आत्मा – कोल्हापूर -
कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धा पाहण्यासाठी दररोज १५ हजारांहून अधिक प्रेक्षक मैदानात उपस्थित राहतात. अशा ठिकाणी राष्ट्रीय फुटबॉल अकादमीची स्थापना झाल्यास देशाला भविष्यात दर्जेदार खेळांडू लाभू शकतात, असा विश्वास खासदारांनी व्यक्त केला.