स्वच्छ भारत अभियानांतर्गत हॉटेल असोसिएशनसोबत महापालिकेची कार्यशाळा
कोल्हापूर : स्वच्छ भारत अभियानाच्या उपक्रमांतर्गत कोल्हापूर महापालिकेच्या आरोग्य घनकचरा विभागामार्फत शहरातील हॉटेल असोसिएशनसोबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रशासक के. मंजूलक्ष्मी व अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली.
कार्यशाळेदरम्यान हॉटेल व्यावसायिकांना ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे वर्गीकृत करूनच महापालिकेच्या घंटागाडी किंवा ट्रॅक्टर–ट्रॉलीकडे सुपूर्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या. एकल वापरातील प्लॅस्टिक टाळणे, प्लॅस्टिक बंदीचे नियम काटेकोर पाळणे व घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2016 नुसार कचरा उघड्यावर फेकल्यास होणाऱ्या दंडात्मक कारवाईची माहितीही देण्यात आली.
उपायुक्त परितोष कंकाळ व सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी हॉटेलमधील सांडपाण्याचे योग्य नियोजन, त्यावर प्रक्रिया तसेच पुनर्वापराच्या शक्यता याबाबत मार्गदर्शन केले. हॉटेल व्यावसायिकांनी महापालिकेच्या घनकचरा व सांडपाणी प्रक्रिया केंद्रांना भेट देऊन झूम प्रकल्पाची माहिती घेण्याचे आवाहनही करण्यात आले.
कार्यशाळेत हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या, अडचणी व सूचना जाणून घेण्यात आल्या. चेंबर ऑफ कॉमर्स, प्लॅस्टिक विक्रेते व दुकानदारांसोबत स्वतंत्र बैठकही आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शानबाग यांनी महापालिकेसोबत सक्रिय सहकार्याचे आवाहन करताना, हॉटेलमधील कचरा वर्गीकरण करूनच घंटागाडी किंवा ट्रॅक्टर–ट्रॉलीकडे देण्याची विनंती केली. शहरातील हॉटेल संघटनेचा कचरा संकलन उपक्रमात 100 टक्के सहभाग राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बैठकीस मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील, असोसिएशनचे पदाधिकारी सचिन शानबाग, सिद्धार्थ लाटकर, विवेक शिंदे, योगेश सावंत, शहर समन्वयक मेघराज चडचणकर, रोहित घोरपडे तसेच मोठ्या संख्येने हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.