समिट अॅडव्हेंचर्सचे १७ साहसवेडे एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी रवाना...!

<p>समिट अॅडव्हेंचर्सचे १७ साहसवेडे एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी रवाना...!</p>

कोल्हापूर : जगातील सर्वात उंचीवरील आणि आव्हानात्मक ट्रेक म्हणजे एव्हरेस्ट बेस कॅम्प आणि काला पठार ट्रेक. जगभरातील गिर्यारोहकांसाठी एव्हरेस्ट सर करणे हे स्वप्न असते, तर ट्रेकर्ससाठी त्या शिखराच्या पायथ्यापर्यंत पोहोचणे म्हणजेच ‘एव्हरेस्ट बेस कॅम्प’ हेच आयुष्यभराचे ध्येय असते. या स्वप्नपूर्तीसाठी कोल्हापूरच्या समिट अॅडव्हेंचर्सच्या मार्गदर्शनाखाली १७ जणांचा ग्रुप २४ ऑक्टोबर रोजी काठमांडूला रवाना झाला. ही मोहीम एकूण १७ दिवसांची असून, १८ वर्षांपासून ६७ वर्षांपर्यंतचे साहसवेडे स्त्री-पुरुष सहभागी झाले आहेत. कोल्हापूरमधून एवढ्या मोठ्या संख्येने गिर्यारोहक एकाच वेळी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहिमेसाठी जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या मोहिमेचं वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर नृत्यांगना संयोगिता पाटील आणि तिच्या तीन शिष्या दिव्या वारके, मिताली महाराज आणि प्रांजली दळवी (पुणे) या चौघीजणी थेंगबोचे (१३,००० फूट), बेस कॅम्प (१७,५०० फूट) आणि काला पठार (१९,४०० फूट) या उंचीवर भरतनाट्यम सादर करणार आहेत. त्या एव्हरेस्टला कला अर्पण करतील, हा एक आगळावेगळा उपक्रम आहे.
या मोहिमेमध्ये डॉ. शैलेंद्र नवरे, डॉ. अमोल कोडोलीकर (अस्टर आधार), नृत्य विशारद संयोगिता पाटील, तिच्या शिष्य दिव्या वारके, मिताली महाराज, प्रांजली दळवी (पुणे), डॉ. सुमती कुलकर्णी, डॉ. अनिता कदम, डॉ. प्रदीप पाटील, सई पाटील, माजी न्यायाधीश वंदना प्रभू तेंडुलकर (गोवा), अभय देशपांडे (रॉकटेक इंजिनिअर्स), संग्राम शेवरे, राजेंद्र पाटील आणि अश्वथा विधाते सहभागी झाले आहेत. या मोहिमेचं नेतृत्व कोल्हापूरची युवा गिर्यारोहिका खुशी कांबोज करत आहे. तिचे वडील व ज्येष्ठ गिर्यारोहक विनोद कांबोज मार्गदर्शक म्हणून सोबत असणार आहेत.

विनोद कांबोज यांनी १९८७ साली अरुण बेळगावकर आणि नारायण जाधव यांच्या सहकार्याने पहिल्यांदा एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठला होता. यंदा ते त्यांच्या २१व्या मोहिमेवर, तर समिट अॅडव्हेंचर्सची ही २०वी एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम ठरत आहे. विशेष म्हणजे, खुशीने वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी वडिलांच्या सोबतीने हा ट्रेक केला होता. आज वडील ६२ वर्षांचे असताना तीच खुशी त्यांच्या सोबतीने पुन्हा एकदा एव्हरेस्टच्या पायथ्याशी पोहोचणार आहे — ही खरी ‘एव्हरेस्ट पेक्षा मोठी’ कहाणी आहे.