भुदरगड किल्ल्यावर खासदार निलेश लंके राबवणार स्वच्छता मोहीम
कोल्हापूर — महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या स्वच्छता आणि संवर्धनासाठी सुरू असलेल्या मोहिमेचा पुढचा टप्पा भुदरगड किल्ल्यावर पार पडणार आहे. या मोहिमेचे नेतृत्व अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके करणार आहेत. खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील कॉंग्रेसचे गटनेते सतेज उर्फ बंटी डी. पाटील, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार रोहित पवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. खासदार लंके हे 25 ऑक्टोबर रोजी पुष्पनगर शाळेत मुक्कामास येणार असून 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजता स्वच्छता मोहीम सुरू होईल.
खासदार लंके यांनी आतापर्यंत शिवनेरी, धर्मवीरगड, रायरेश्वर, रामशेज, तिकोणा, प्रतापगड आणि विश्रामगड या किल्ल्यांवर स्वच्छता मोहिमा यशस्वीपणे राबवल्या आहेत. आता त्यांनी ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या महत्त्वाच्या भुदरगड किल्ल्याची स्वच्छता करण्याचा संकल्प केला आहे.
भुदरगड किल्ला शिलाहार राजा भोज दुसरा यांनी बांधला असून, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला लष्करी महत्त्व दिले. हा किल्ला सह्याद्रीच्या रांगांमध्ये ३२०८ फूट उंचीवर स्थित आहे आणि येथे श्री केदारलिंग, भैरवनाथ, जकूबाई अशी प्राचीन देवस्थाने आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने व्ही. बी. पाटील व आर. के. पोवार यांनी जिल्ह्यातील दुर्गप्रेमी, गडप्रेमी, तरुण मंडळे, तालीम संस्था आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते यांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
पत्रकार बैठकीत कार्याध्यक्ष अॅड. अनिल घाटगे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण उपस्थित होते.