गगनबावडा आगाराच्या ढिसाळ कारभाराबाबत तालुक्यातील जनतेकडून संताप

कोल्हापूर - राज्य परिवहन महामंडळाच्या गगनबावडा आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसतो आहे. गणेशोत्सव संपला तरी बसेसच्या अभावी प्रवाशांना तीन ते चार तास एसटी बसची वाट पाहात बसावे लागत आहे. यामुळे प्रवाशांना त्रास होण्याबरोबरच एस टी महामंडळाला देखील मोठा आर्थिक फटका बसत आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या गगनबावडा आगाराच्या ढिसाळ कारभाराचा फटका प्रवाशांना बसत आहे. मुंबईत राहणारे कोकणवासिय गणेशोत्सव काळात मुंबईहून आपल्या गावी आले होते. पण आता गणेशोत्सव संपला तरी बसेस नसल्यानं प्रवाशांना तीन ते चार तास बसस्थानकात ताटकळत बसावं लागतंय. बसेस अभावी कोकणवासिय प्रवाशांना जादा पैसे मोजून खाजगी वाहनांचा आधार घ्यावा लागतोय. यामुळं प्रवासी वर्गातून संताप व्यक्त होत आहे.
लांब पल्ल्याच्या बसेसची उणीव, ठराविक वाहक आणि चालकांच्या सेवा, बसेस वेळेवर न सुटणे, वाहक आणि चालकांची मनमानी, अचानक बसेस रद्द करणे, असा गगनबावडा एस टी आगाराचा भोंगळ कारभार असून याकडं वरिष्ठ अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे. यामुळं प्रवाशांना त्रास होण्याबरोबरच एस टी महामंडळाला देखील मोठा आर्थिक फटका बसत आहे.