पंचगंगा नदी घाटावर उघड्यावर पडलेल्या 1500 गणेश मूर्तींचे संकलन

कोल्हापूर - कोल्हापूरमधील पंचगंगा नदी घाटावर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्स तोडून गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते. नदीच्या पाणीपातळीत घट झाल्यानंतर काही गणेश मुर्त्या उघड्यावर पडल्या. त्याचबरोबर निर्माल्य सुद्धा काठावर आले. त्यामुळे पंचगंगा आरती मंडळ आणि सामाजिक कार्यकर्ते सुशिल भांदिगरे यांनी पुढाकार घेऊन मूर्ती, निर्माल्य आणि इतर कचरा संकलित करण्यास सुरुवात केली. गेल्या तीन दिवसापासून हे काम सुरु होते. यामध्ये आज राजाराम महाविद्यालय, महावीर कॉलेज, विवेकानंद महाविद्यालय आणि शहाजी कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थींनी सहभाग घेतला. आज तिसऱ्या दिवशी संपूर्ण नदी घाट परिसर स्वच्छ झाला असून गेल्या तीन दिवसांत 1500 गणेश मूर्त्यांचे संकलन करण्यात आले आहे. संकलिक गणेश मूर्त्या, निर्माल्य आणि कचरा महापालिकेकडे सुपूर्द करण्यात आला. या गणेश मुर्त्यांचे इराणी खाणीत पुनविर्सजन करण्यात येणार आहे. या स्वच्छता मोहिमेत महेश कामत, पप्पू शेठ, राजेंद्र बुचडे, चंद्रकांत हंडे, हिंदू एकताचे दीपक देसाई, गणेश जाधव, कपिल सूर्यवंशी, शशिकांत जाधव, संदीप कुंभार यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता.