इचलकरंजीत रस्त्यांवरील खड्ड्यांचा गणपती बाप्पाला बसला फटका...

इचलकरंजी – शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या ही नेहमीचीच झाली आहे. रस्त्यांवरील अपघातांमधील बहुतांश अपघात हे खड्डयांमुळंच होतात. या रस्त्यांवरील खड्ड्यांचा फटका आता चक्क गणपती बाप्पालाच बसलाय. हे ऐकून तुम्हाला खर वाटणार नाही, पण हे घडलंय इचलकरंजी शहरात...
इचलकरंजीतील जवाहरनगर परिसरातून अठरा फूट उंचीची गणेश मूर्ती घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या खड्डयामध्ये ट्रॅक्टर ट्रॉलीचं चाक अडकलं चाक बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टर पुढंमागं करताना मूर्तीचा तोल जाऊन ती समोर असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली. यामुळे पाच जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
ही मूर्ती विधिवत विसर्जित करण्यात आलीय. ही घटना होते ना होते तोच शहापूरमध्ये विजेच्या तारांमुळं दुसरा एक प्रकार घडला. शहापूर मधून संत मळ्याकडे एक मंडळ १४ फूट उंचीची गणेश मूर्ती घेऊन जात होते. एसटी आगार समोरून जात असताना एका विजेच्या तारेला गणेश मूर्तीची प्रभावळ अडकली. ही प्रभावळ तुटून तिथं असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या अंगावर पडली. यामध्ये मूर्ती दुखावली गेली. कार्यकर्त्यांनी लगेच ती मूर्ती शहापूरच्या खाणीमध्ये विसर्जित केली. या दोन्ही घटनांमुळे इचलकरंजी शहरांत एकच खळबळ उडालीय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे या दोन्ही घटना घडल्या असल्याची इचलकरंजीत चर्चा सुरु आहे.