७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ७९ किलोमीटर तिरंगा सायकल रॅलीने जवानांना अनोखी मानवंदना !

कोल्हापूर – देशासाठी बलिदान दिलेल्या व युद्धामध्ये धैर्याने व शौर्याने कामगिरी करणाऱ्या भारतीय जवानांच्या सन्मानार्थ आणि ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने सायकल वेडे कोल्हापूर या संस्थेच्या वतीने एक अनोखी आणि प्रेरणादायक ७९ किलोमीटरची तिरंगा सायकल रॅली आयोजित करण्यात आली. देशभक्तीने भारावलेल्या या रॅलीत प्रदूषण मुक्ततेचा संदेश देण्यात आला. सायकलस्वारांनी शहरातील प्रमुख मार्गांवरून सायकलफेरी काढत राष्ट्रध्वजाचा मान उंचावला. यामध्ये संस्थेचे अध्यक्ष राम कारंडे, उपाध्यक्ष पांडुरंग माळी, जयदीप पाटील, अक्षय माळी, भीमराव सुतार, राजकुमार येतेवडेकर, दिनकर पोवार, अनिल चिले, सुनील येतेवडेकर, राहुल मसोटे, अंकुश पाटील तसेच डॉ. कृष्णा चौगुले हे सहभागी झाले होते.
या उपक्रमादरम्यान पोलीस मित्र संघटनेच्या वतीने भारतीय जवानांच्या हस्ते सर्व सायकलस्वारांचा सन्मान करण्यात आला. देशभक्ती आणि पर्यावरणपूरकता यांचा मिलाफ साधणारा हा उपक्रम सर्वांचंच लक्ष वेधून गेला. स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करतानाच आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, हे या रॅलीने सिद्ध केलं.