धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळाच्या पर्यावरणपूरक वरदविनायक गणेशमूर्तीचा आगमन सोहळा उत्साहात

कोल्हापूर - लक्ष्मीपुरी येथील धान्य व्यापारी सांस्कृतिक मंडळ यांच्यातर्फे महाराष्ट्रातील पर्यावरणपूरक आणि कायमस्वरूपी गणेशमूर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे. या आगमन सोहळ्याचे अध्यक्षस्थान खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी भूषवले, तर उद्घाटन कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
प्रमुख उपस्थितीमध्ये डॉ. राहुल पाराशर, संचालक कुमार अहुजा, वैभव सावर्डेकर, विजय कागले यांचा समावेश होता. या उपक्रमाला एक सामाजिक व भावनिक स्पर्श लाभावा म्हणून ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध शाळेतील विद्यार्थ्यांसोबत महाआरती करण्यात आली.
पर्यावरणपूरक मूर्तीचा आगळावेगळा उपक्रम –
या वर्षी धान्य व्यापारी मंडळाने पर्यावरणपूरक, कायमस्वरूपी मूर्ती प्रतिष्ठापित करण्याचा संकल्प केला. ही मूर्ती प्रसिद्ध मूर्तिकार संदीप कातवरे यांनी तयार केली असून संपूर्ण जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रभरातून त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.
उत्सवाची शान वाढवणारी मिरवणूक -
मिरवणुकीत १५० हून अधिक व्यापारी गणेशभक्तांनी पोशाख परिधान केला होता. विश्व वारकरी जिल्हाध्यक्ष ओंकार महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ५५-६० बालकलाकारांनी पारंपरिक, सादरीकरणात्मक आणि सांस्कृतिक कला सादर केल्या. धर्मशील श्री शंभो ढोल पथक व महाराष्ट्र बँड यांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तीमय वातावरण निर्माण केले. मिरवणूक सायकांळी साडेपाच वाजता मिरजकर तिकटी येथून सुरू होऊन रात्री साडेनऊ वाजता लक्ष्मीपुरी गणेश मंदिर येथे विसर्जित झाली.
स्थायी प्रतिष्ठापना व दर्शन –
मिरवणूक विसर्जनानंतर धान्य व्यापारी बालकल्याण संस्था इमारतीतील मंदिरात वरदविनायक गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना श्री महावीर रामचंद्र मुग व परिवाराच्या शुभहस्ते करण्यात आली. शनिवारी १६ ऑगस्ट २०२५ पासून मूर्ती दर्शनासाठी खुली असून मंडळाने सर्व भक्तांना दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
सामाजिक बांधिलकीचे उदाहरण मंडळातर्फे सामाजिक बांधिलकी जपत ज्ञान प्रबोधन भवन संचलित अंध शाळेला ११,००० चा धनादेश सुपूर्त करण्यात आला.
यावेळी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी यादव, उपाध्यक्ष सागर सन्नकी, खजिनदार विजय कागले, सचिव बलराज निकम, उत्सव कमिटी उपाध्यक्ष वैभव लाड यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी, व्यापारी आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.