‘गोकुळ’ च्या रक्षाबंधन परंपरेतून २० वर्षांचा ऋणानुबंध जपला...

कोल्हापूर – गोकुळ डेअरीच्या उपक्रमशीलतेने सुरु झालेल्या एका हृदयस्पर्शी परंपरेला यंदा २० वर्षे पूर्ण झाली. २००५ साली तत्कालीन चेअरमन विश्वास पाटील यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या रक्षाबंधन उपक्रमात दरवर्षी निराधार महिलांकडून गोकुळच्या पदाधिकाऱ्यांना राखी बांधली जाते. या परंपरेचे जतन व सन्मान आजही अखंडपणे सुरू आहे.
यंदाचा रक्षाबंधन कार्यक्रम गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालयात पार पडला. यावेळी सध्याचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, व संचालक युवराज पाटील यांना राजापूर (ता. शिरोळ) येथील श्रीमती भारती चिंचणे व बेलवले (ता. कराड) येथील श्रीमती वैशाली शिंदे यांनी राखी बांधली.
या वेळी भावना व्यक्त करताना वैशाली शिंदे म्हणाल्या, "गोकुळचे आशीर्वाद आमच्या सारख्या निराधार महिलांसाठी नवीन आयुष्याची प्रेरणा ठरले आहे. गोकुळचा ऋणानुबंध जीवनात न विसरण्यासारखा आहे. मला गोकुळने दिलेल्या आधारामुळे मी २१ वर्षे प्रबोधनाचं कार्य करत आहे."
भारती चिंचणे यांनी त्यांच्या दु:खद अनुभवाची आठवण सांगितली. २००५ च्या महापुरात पती, घर आणि जनावरे गमावलेल्या भारती यांना, गोकुळच्या माध्यमातून घर बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळाली होती. या मोलाच्या मदतीने त्यांचे आयुष्य सावरले.
या कार्यक्रमात कार्यकारी संचालक डॉ. योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आणि दीपक पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.