'कोल्हापूर फर्स्ट'च्या प्रथम कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ

<p>'कोल्हापूर फर्स्ट'च्या प्रथम कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ</p>

कोल्हापूर – कोणतेही श्रेयवादाचे राजकारण न करता कोल्हापूरच्या विकासासाठी निर्माण झालेल्या 'कोल्हापूर फर्स्ट' प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सर्वजण एकत्र आले आहेत. कोल्हापूर फर्स्ट हा केवळ एक उपक्रम नसून, कोल्हापूरच्या विकासासाठी एक प्रभावी प्लॅटफॉर्म बनला आहे, असं प्रतिपादन खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी केलंय. रेसिडेन्सी क्लबमध्ये 'कोल्हापूर फर्स्ट' च्या प्रथम कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते.

कोल्हापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासाठी 'कोल्हापूर फर्स्ट' या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी एकत्र येत एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय. १६ विविध संघटनांनी एकत्र येऊन ‘कोल्हापूर फर्स्ट’ या प्लॅटफॉर्मची निर्मिती केलीय. या प्लॅटफॉर्मचा पहिला पदग्रहण सोहळा व कार्यकारिणी निवड शुक्रवारी रेसिडेन्सी क्लबमध्ये संपन्न झाली. यामध्ये अध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत, उपाध्यक्ष डॉ. अमोल कोडोलीकर, उपाध्यक्ष प्रताप पाटील, सचिव बाबासाहेब कोंडेकर, सहसचिव उज्वल नागेशकर, सहसचिव जयदीप पाटील, खजानिस सीपद्मसिंह पाटील, सहखजानिस सीए नितीन हरगुडे यांचा समावेश आहे. कार्यकारिणीतील सर्वांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 'कोल्हापूर फर्स्ट'च्या कार्याचा आढावा घेणारा माहितीपट सादर करण्यात आला. या माहितीपटामध्ये आतापर्यंत झालेल्या उपक्रमांचा, संघटनांच्या सहभागाचा आणि भविष्यातील दिशादर्शक उद्दिष्टांचा सारांश देण्यात आला. यानंतर 'कोल्हापूर फर्स्ट'च्या अधिकृत संकेतस्थळाचे उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. या संकेतस्थळाच्या माध्यमातून उपक्रमाची माहिती, योजनांची रूपरेषा आणि नागरिकांचा सहभाग वाढवण्याचा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं.

कार्यक्रमात नितीन वाडीकर, डॉ. अशोक भुपाळी, सचिन शिरगावकर, सतीश घाटगे, करुणाकर नायक, सिद्धार्थ लाटकर, कृष्णात पाटील, विद्यानंद बेडेकर,गिरीश वझे, सतीश डकरे, अमर सासने, शांताराम सुर्वे, संजय जोशी, 'आस्मा'चे अध्यक्ष अमरदीप पाटील, कोल्हापूर ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनाकॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मनीष नागावकर, सोसायटी ऑफ अॅनास्थेसिऑलॉजिस्ट कोल्हापूरच्या अध्यक्ष डॉ. आरती जाधव आदी विशेष निमंत्रित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. तसंच कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्याबद्दल 'कोल्हापूर फर्स्ट'च्या वतीने जिल्हा बार असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

खासदार शाहू महाराज म्हणाले, सर्कीट बेंचसाठी ४५ वर्षाच्या लढ्याला अखेर यश मिळालं. न्याय आणि आरोग्यासारख्या मूलभूत गरजांसाठी छत्रपती शहाजी महाराज आणि राजाराम महाराज यांनी शेंडा पार्क व सद्याच्या सर्किट चेंबर परिसरात राखीव ठेवलेली जागा आज न्यायालयासाठी वापरली जाते. शेंडा पार्कमध्ये आता आयटी उद्योग उभारण्यात येणार असून, हा उपक्रम कोल्हापूरच्या आर्थिक विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणारय. कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विमानतळ, रेल्वे, शेती, उद्योग, आरोग्य आणि शिक्षण या सर्व क्षेत्रांना गती देणे आवश्यक असून, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे आणि एकसंधपणे कार्य करण्याचं त्यांनी उपस्थितांना आवाहन केलं.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, 'कोल्हापूर फर्स्ट' या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून सुरुवात अतिशय सकारात्मक झाली असून सर्किट बेंच मंजूर झाले हे त्याचं ठोस उदाहरण आहे. त्याच धर्तीवर आता कोल्हापूरसाठी एअरपोर्ट आणि रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्यावर भर दिला जाणारय. भविष्यकाळाचे स्पष्ट व्हिजन समोर ठेवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आता झपाटून आणि ध्येयवेडेपणाने काम करावे लागेल, असं आबिटकर यांनी सांगितलं.

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, "जिल्ह्यासाठी डाटा सेंटर, आयटी आणि पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महानगरपालिका हद्दवाढीचा प्रश्नही लवकरच मार्गी लागेल," अशी माहिती त्यांनी दिली.

'कोल्हापूर फर्स्ट'चे अध्यक्ष सुरेंद्र जैन यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं. त्यांनी प्लॅटफॉर्मच्या उद्दिष्टांबाबत उपस्थितांना माहिती देवून विविध संघटनांनी याकामी घेतलेल्या पुढाकाराचं कौतुक केलं.

उपाध्यक्ष अॅड. सर्जेराव खोत यांनी, शाहूकालीन न्यायव्यवस्थेपासून ते सध्याच्या सर्किट बेंचच्या मंजुरीपर्यंतचा सविस्तर इतिहास उपस्थितांसमोर मांडला. त्यांनी कोल्हापूरच्या न्यायिक प्रवासावर प्रकाश टाकत, या लढ्यातील महत्त्वाच्या टप्प्यांची माहिती दिली.

यावेळी आमदार अशोकराव माने, क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्यासह ‘कोल्हापूर फर्स्ट’मध्ये सहभागी १८ विविध संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.