कोडोलीतील बालोद्यान कागदावरच...निधी मात्र खर्च  

<p>कोडोलीतील बालोद्यान कागदावरच...निधी मात्र खर्च  </p>

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावात ग्रामपंचायत इमारती समोर 15 व्या वित्त आयोगातून सन 2021-22 या वर्षात  तीन लाख 92 हजार 196 रुपये खर्च करून महिला आणि बालकांसाठी बालोद्यान उभारले असल्याचा अहवाल पंचायत समितीकडून देण्यात आला आहे. त्यासाठीची आवश्यक असलेली तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. तसेच  ग्रामपंचायतीच्यावतीने 26 जून 2022 रोजी कार्यारंभ आदेश पारित करण्यात आला आहे. या आदेशानुसार ३ लाख 92 हजार 196 रुपये खर्च झाल्याचे दिसून येत आहे. परंतु प्रत्यक्षात बालोद्यान दिसत नसल्यामुळे हा निधी नेमका कुठं खर्च झालाय, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित होत आहे.

याबाबत पन्हाळा पंचायत समितीशी संपर्क साधला असता, पंचायत समितीला उपलब्ध झालेल्या ग्रामपंचायतीच्या ठरावानुसार, हा निधी कोडोलीतील छत्रपती शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी वापरला गेला असल्याचे  पन्हाळा पंचायत समितीचे शाखा अभियंता संजय काटकर यांनी सांगितले. बालोद्यान कागदावर दाखवून निधी मात्र खर्च करण्याच्या या प्रकाराबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.