जिल्हा परिषदेतील राजर्षी शाहूंच्या नावाच्या सभागृहासमोर ‘काळी बाहुली’… कोल्हापुरात संतापाची लाट
कोल्हापूर : पुरोगामी विचारांची ओळख असलेल्या कोल्हापुरात एक धक्कादायक आणि अस्वस्थ करणारी घटना उघडकीस आली. जिल्हा परिषद कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू सभागृह च्या प्रवेशद्वारावर काळी बाहुली बांधण्यात आल्याचा प्रकार समोर आला आणि एकच खळबळ उडाली. ही घटना केवळ एक कृती नसून, सामाजिक समतेचे पुरस्कर्ते राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांनाच आव्हान देणारी असल्याची तीव्र भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. विज्ञाननिष्ठा, धर्मनिरपेक्षता आणि सामाजिक न्यायाचा वारसा जपणाऱ्या कोल्हापुरात अशा अंधश्रद्धाजन्य प्रकाराला जागा मिळणे, अनेकांच्या दृष्टीने अत्यंत धक्कादायक ठरले आहे.
☑️राजर्षी शाहूंच्या विचारांच्या पायावरच घाव...
राजर्षी शाहू महाराजांच्या नावाने असलेल्या सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच हा प्रकार घडल्याने, “ही केवळ अंधश्रद्धा नाही, तर त्यांच्या विचारांचा अपमान आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया उमटू लागलीय. प्रशासनाच्या परिसरातच अशा घटना घडत असतील, तर सामान्य समाजाला काय संदेश जातो, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
☑️प्रशासनावर प्रश्नचिन्ह...
शासकीय कार्यालये ही संविधानिक मूल्यांची जपणूक करणारी केंद्रे मानली जातात. मात्र, अशा प्रकारांमुळे प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृतींना आळा घालण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे का, अशी चर्चा रंगू लागली आहे.
☑️‘कारवाई करा, नाहीतर आंदोलन’
या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी पुढे आली आहे.संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान च्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना निवेदन देण्यात आले. “अशा अंधश्रद्धाजन्य प्रकारांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली नाही, तर संविधानिक मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल.” असा इशारा संस्थेचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराम बुध्याळकर, सचिव पंकज आठवले, तसेच प्रविण आजरेकर, सुरेश आठवले, रंगनाथ शिवशरण यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दिलाय. राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कोल्हापुरात घडलेली ही घटना केवळ संतापजनक नसून, समाजाच्या वैज्ञानिक दृष्टिकोनावर प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे. आता प्रशासन या प्रकरणावर किती त्वरेने आणि कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.