पेठवडगावच्या निसर्गप्रेमी मित्र संस्थेने केली पशू, पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय
कोल्हापूर - आटलेले पाणवठे, त्यात उन्हाचा तडाखा, अशातच तहान लागली तर पशु पक्ष्यांनी जायचे कुठे, असा प्रश्न पडतो. रखरखत्या उन्हात 'त्या' जीवांची तहान फक्त दोन थेंबांची असते, याचा विचार करत पेठवडगावच्या निसर्गप्रेमी मित्र ग्रुपने सिद्धोबाच्या डोंगरात पक्ष्यांसाठी पाणवठा बनवून त्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला आहे.
उन्हाच्या तडाख्याने डोंगरात शिल्लक राहिलेल्या थोड्या फार पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणवठे पूर्णतः आटलेले असतात. त्याच्या आसपास पाण्याचा नैसर्गिक स्रोत उपलब्ध नसतो. त्याचा परिणाम पशू-पक्ष्यांवर होतोय. कित्येक पशू-पक्ष्यांना पाणी न मिळाल्याने ते उष्माघाताने मृत्युमुखी पडत असतात काही वेळा वन्य प्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत आलेले दिसतात. याचा विचार करून पेठवडगावमधील निसर्गप्रेमी मित्र संस्थेच्या सदस्यांनी उन्हाळ्यात कोरडे पडलेले पाणवठे भरून तिथे असणाऱ्या पशू, पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. पेठ वडगावपासून १० कि.मी. अंतरावर सिद्धेश्वर डोंगर रांगा आहेत. या रांगेत कमालीची जैवविविधता असून, त्या भागात दुर्मिळ झाडे आणि पशू-पक्ष्यांचा अधिवास आहे. उन्हाळ्यात येथे असणारे नैसर्गिक पाणवठे पूर्णपणे आटून जातात. त्यामुळे त्या भागात असणाऱ्या पशू-पक्ष्यांना पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असते. ही बाब लक्षात आल्यानंतर निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे सदस्य कॅन, किटली, बाटल्या आणि कावडीचा वापर करून, पाणवठ्याद्वारे पशू-पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करत आहेत.
या उपक्रमात निसर्गप्रेमी मित्र संस्थेचे डॉ. अमोल पाटील, प्रकाश जगदाळे, अमोल चरणकर, डॉ. राजन अतिग्रे, निसर्ग अभ्यासक प्रमोद माळी, नेताजी पाटील, डॉ. शुभम करडे, धनंजय कुंभार, बिपीन माळी, नामदेव पिंपळकर आदींनी सहभागी घेतला.