ऐतिहासिक माणगाव परिषदेचा 106 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार...!

<p>ऐतिहासिक माणगाव परिषदेचा 106 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहाने साजरा होणार...!</p>

कोल्हापूर - 21 व 22 मार्च 1920 रोजी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने आणि विचाराने ऐतिहासिक सन्मानभूमी माणगाव नगरी येथे संपन्न झालेल्या दक्षिण महाराष्ट्रातील पहिल्या बहिष्कृत परिषदेस यावर्षी 106 वर्षे पूर्ण होत आहेत. या ऐतिहासिक दिनाचे महत्त्व विचारत घेऊन या काळात सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत. यासाठीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे अध्यक्षतेखाली आणि माणगाव स्मारक समिती सदस्य, ग्रामपंचायत पदाधिकारी, आणि नागरिक यांचे उपस्थितीत बैठक संपन्न झाली. 


या बैठकीनुसार, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे, ग्रामपंचायत व बौद्ध समाज माणगाव यांच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये दिनांक 21 मार्च 2026 रोजी सकाळी ठीक 9.00 वाजता रुपेश निकाळजे (बीड) प्रस्तुत क्रांतीचा साक्षीदार हा एक पात्री नाटक सादर होणार असून तदनंतर महामानवांना पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, नूतन जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा शशिकांत खोत यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व विविध प्रशासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
 
या कार्यक्रमास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंबातील वंशज, छत्रपती शाहू महाराज यांचे कुटुंबातील वंशज व आप्पासाहेब पाटील यांच्या कुटुंबातील वंशज देखील उपस्थित राहणार असून दिनांक 22 मार्च 2026 रोजी सायंकाळी महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे  यांचा डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे लाईव्ह शिंदेशाहीचा भीमशाही गाणी व कबीर नाईकनवरे प्रस्तुत सलाम संविधान प्रबोधन पर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

या दोन दिवसीय उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पुणे यांच्या वतीने सवलतीच्या दरात पुस्तकांचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महामानवांच्या कर्तुत्वाने सामाजिक परिवर्तनाची मुहूर्तमेढ रोवली गेलेल्या आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सन्मान भूमीत महामानवांच्या कार्यांना आणि विचारांना अभिवादन करण्यात येणार आहे असे समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांनी म्हटले आहे.