विकास हवा, पण राधानगरीचा 'गोवा' होऊ देऊ नका : ज्येष्ठ संपादक वसंत भोसले
कोल्हापूर – राधानगरी तालुका मागास नाही. परंतु औद्योगिकीकरण आणि निसर्गाला धक्का न लावता विकास व्हायला हवा. पर्यटन विकास होत असताना राधानगरीचा गोवा होऊ देवू नका, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी केले. स्थानिकांनी जमिनी विकू नयेत, यासाठी लोकप्रतिनिधींसह पत्रकारांनी जागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. राधानगरी तालुका पत्रकार संघाच्यावतीने राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी ते बोलत होते.
यावेळी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी, तालुक्याच्या विकास दृष्टीवर सखोल आणि परखड भाष्य केले. राधानगरी धरणाची सुरुवात शंभर वर्षांपूर्वी झाली असताना धामणी धरण पूर्ण होण्यासाठी तीस वर्षे लागणे दुर्दैवी आहे. ब्रिटिशांनी भंडारधरा धरण पूर्ण केले, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी धरण उभारले. पश्चिम घाटात राजांनी उभारलेली दोन धरणे ऐतिहासिक ठेवा असल्याचे त्यांनी सांगितले.
दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्रकुमार चौगले यांनी, पाच जिल्हा परिषद आणि दहा पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन विकासाचा चौफेर आराखडा राबवण्याचे आवाहन केले. यावेळी नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेट, गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, शशिकांत बैलकर, राजेंद्र पाटील, प्रा. चंद्रशेखर कांबळे, राजू पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, संग्राम कलिकते, प्रा. बी. एस. बरगे यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष एन. जी. नलवडे संघाचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे सदस्य आणि सभासद उपस्थित होते.