बाबुभाई परीख पूल ठरतोय जीवघेणा; महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना 

<p>बाबुभाई परीख पूल ठरतोय जीवघेणा; महापालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना </p>

कोल्हापूर शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग असलेला बाबुभाई परीख पूल सध्या गंभीर दुरवस्थेत असून महापालिका प्रशासनाच्या कारभारावर तीव्र टीका होत आहे. रेल्वे स्टेशन आणि मध्यवर्ती बसस्थानकाला जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. पुलावरून रेल्वेलाईन गेल्यामुळे आधीच अरुंद जागा आणि त्यातच रस्त्याची खराब अवस्था यामुळे सतत वाहतूक कोंडी निर्माण होते.

या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करत अनेक वर्षांपासून आंदोलने झाली, निवेदने देण्यात आली; मात्र प्रशासनाकडून केवळ तात्पुरती डागडुजी करण्यात आली. परिणामी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’च होते.

महापालिकेने काही दिवसांपूर्वीच येथे सिमेंट काँक्रीटचा रस्ता केला आहे. काम पूर्ण झाल्यानंतर वाहतूक सुरळीत होईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र प्रत्यक्षात रस्त्यातील त्रुटी कायम असून दुरवस्था दूर झालेली नाही. एकाच बाजूचा रस्ता केला, अजून दुसऱ्या बाजूचा केलेला नाही. दोन्ही बाजूंनी रस्त्याचं काम पूर्ण करण्याअगोदरच वाहतूक सुरू केली

गटारींवर ठेवलेले बॅरीकेट गटारीत कोसळलेले दिसतात. दुचाकी आणि चारचाकी वाहने अडकत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे मोठ्या अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. रोज हजारो नागरिक या मार्गाने प्रवास करत असताना त्यांच्या सुरक्षिततेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

उड्डाणपूल हा या समस्येवर कायमस्वरूपी उपाय ठरू शकतो, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र या प्रश्नाकडे राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे.

आता आश्वासनांची नव्हे, तर ठोस कृतीची वेळ आली आहे. अन्यथा बाबाभाई परीख पूल हा वाहतुकीचा दुवा न राहता अपघाताचा केंद्रबिंदू ठरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.