आंबेवाडी तलवार हल्ल्यातील जखमींच्या घरी आमदार सतेज पाटील यांची भेट

<p>आंबेवाडी तलवार हल्ल्यातील जखमींच्या घरी आमदार सतेज पाटील यांची भेट</p>

कोल्हापूर – करवीर तालुक्यातील आंबेवाडी येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या तलवार हल्ल्यात जखमी झालेल्या सरपंचांच्या पती व दिराची आज विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी घरी जाऊन भेट घेत विचारपूस केली.

आंबेवाडी येथील पाणंद रस्त्यावर खुलेआम दारू व गांजाचे सेवन करणाऱ्या तरुणांना मज्जाव केल्याने हा हल्ला झाल्याचे समोर आले आहे. सरपंच सुमन पाटील यांचे पती, माजी सरपंच मारुती गणपती पाटील आणि त्यांचे दिर तुकाराम गणपती पाटील यांनी संबंधित तरुणांना हटकल्याबरोबरच पोलिस ठाण्यात तक्रारही दिली होती. याच रागातून हर्षवर्धन शरद सुतार, विशाल सुभाष फाळके, रजत राजाराम गुरव यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांनी रात्रीच्या सुमारास प्रयाग-चिखली रोडवरील पाटील गल्लीजवळ असलेल्या किराणा दुकानात घुसून तलवारीने हल्ला केला.  हल्ल्यात तुकाराम पाटील यांच्या हाताचे बोट तुटले, तर मारुती पाटील यांच्या खांद्यावर व कोपरावर वार झाले. दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. आज विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी घरी जाऊन भेट घेत विचारपूस केली. जखमींची भेट घेतल्यानंतर आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरमध्ये वाढत्या गांजा व नशाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे. “नशेखोर आणि गुंड प्रवृत्तीच्या तरुणांविरोधात ठोस कारवाई होत नसल्याने त्यांचे मनोबल वाढत आहे. प्रशासनाने तातडीने विशेष मोहीम राबवावी,” असे ते म्हणाले.

यावेळी गोकुळचे संचालक बाबासो चौगुले, वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगुले उपस्थित होते.