मुरगुडमध्ये भरला बकऱ्यांचा भव्य बाजार...

<p>मुरगुडमध्ये भरला बकऱ्यांचा भव्य बाजार...</p>

कोल्हापूर - मुरगुडचा आठवडी बाजार हा बकऱ्यांसह जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. यंदाच्या बाजारात स्थानिक व्यापाऱ्यांसोबत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील व्यापाऱ्यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. विविध जातींच्या आणि चांगल्या प्रतीच्या बकऱ्या विक्रीसाठी दाखल झाल्याने ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता.

बाजारात बकऱ्यांचे दर ११ हजार रुपयांपासून ते तब्बल ४० हजार रुपयांपर्यंत होते. वजन, जात आणि आरोग्य यावर बकऱ्यांची किंमत अवलंबून असल्याने चांगल्या प्रतीच्या बकऱ्यांना विशेष मागणी होती. मात्र, यंदा किंमती वाढल्याने काही ग्राहकांमधून नाराजीचे सूरही उमटताना दिसले.

बाजार परिसरात वाहनांची वर्दळ, ग्राहकांची गर्दी आणि खरेदी-विक्रीची लगबग दिवसभर सुरू होती. यात्रेच्या निमित्ताने भरलेल्या या बाजारामुळे स्थानिक शेतकरी, पशुपालक आणि व्यापाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असून परिसरातील इतर व्यवसायांनाही चालना मिळाली आहे.