महात्मा जोतिबा फुले पुतळा विटंबना : छगन भुजबळांचे अमित शाहांना पत्र
तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची घटना समोर आली असून त्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत. या प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
७ फेब्रुवारी रोजी दिवसाढवळ्या झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय व गंभीर गुन्हा असून, यामुळे कोट्यवधी फुले समर्थकांच्या भावना दुखावल्या असल्याचे भुजबळ यांनी नमूद केले आहे. महात्मा ज्योतिबा फुले हे सामाजिक व शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत असून त्यांच्या विचारांवर व प्रतिमेवर झालेला हल्ला म्हणजे सामाजिक समता, स्त्री शिक्षण आणि मानवतावादी मूल्यांवर आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेतील दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. विटंबना झालेल्या ठिकाणी नव्याने पुतळा उभारण्यात यावा तसेच भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी योग्य सुरक्षा व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी भुजबळ यांनी पत्राद्वारे केली आहे. महात्मा जोतिबा फुले यांचा अपमान समाज कधीही सहन करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.