चैत्र यात्रेसाठी राज्यासह परराज्यातील लाखो भाविक जोतिबा डोंगराच्या दिशेने...
कोल्हापूर - आज कामदा एकादशी, आजपासून जोतिबाच्या चैत्र यात्रेला सुरुवात होते. आज दुपारी बारा वाजता कर्नाटकातील बेळगाव येथील सासनकाठ्या आणि भाविक जोतिबा डोंगरावर दाखल झाले आहेत. दरवर्षी १२७ किलोमीटर अंतर चालत बेळगावचे भाविक सासनकाठी घेऊन येतात. आता चार दिवस त्यांचे डोंगरावर वास्तव असणार आहे. पारंपारिक वाद्य, पताका, ढोल, ताशा, मशाल अशा लवाजम्यासह भाविक आणि सासनकाठी दक्षिण दरवाजातून मंदिरात दाखल झाली आहेत. यावेळी महिलांनी भाविक आणि सासनकाठीचे औक्षण केले. मंदिरात गावकऱ्यांनी सासनकाठीचे स्वागत केले.
मंदिर प्रदर्शना काढल्यानंतर सासनकाठी मूळस्थानी रवाना करण्यात आली. यावेळी सासनकाठी सोबत बेळगावातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेच्या अनुषंगाने प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. यात्रेला येणाऱ्या सर्व भाविक आणि स्थानिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पन्हाळाच्या तहसीलदार माधवी शिंदे यांनी केले आहे. जोतिबाच्या दर्शनासाठी आज भाविकांनी डोंगरावर गर्दी केली होती.
जोतिबाच्या चैत्र यात्रेचा मुख्य दिवस एक एप्रिल आहे. त्यामुळे आतापासूनच डोंगरावर सासन काठ्या आणि भाविक येण्यास सुरुवात झाली आहे.