जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांच्या आरोपाचा परिते ग्रामस्थांकडून निषेध... गावातून काढली निषेध रॅली

<p>जोतिबा डोंगरावरील पुजाऱ्यांच्या आरोपाचा परिते ग्रामस्थांकडून निषेध... गावातून काढली निषेध रॅली</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील परिते गावातून सुमारे पाचशेहून अधिक अबालवृद्ध, महिला, पुरुष भाविक सासनकाठी घेवून जोतिबा डोंगरावर गेले होते.

यावेळी काही भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये धक्काबुक्कीचा प्रकार घडला आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावेळी  भाविक मदयपान करून आले होते तसेच त्यांनी महिला आणि पुजाऱ्यांची छेड काढली, असा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. या निषेधार्थ परिते ग्रामस्थांनी आज गावातून निषेध फेरी काढली. यामध्ये शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अजित पाटील, शेतकरी संघटनेचे जनार्दन पाटील यांच्यासह शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते. पुजाऱ्यांनी केलेला आरोप पूर्णपणे खोटा असल्याचे परितेचे सरपंच मनोज पाटील यांनी सांगितले.

डोंगरावरून सासनकाठी परिते गावात आल्यानंतर ग्रामदैवत ज्योतिर्लिंगाची तीन दिवस यात्रा भरते ही यात्रा व्यसनमुक्तीचा संदेश देणारी मानली जाते. यात्रेदरम्यान गावात मांसाहार, मद्यपानास सक्त मनाई असते. अशा पवित्र परंपरेत सहभागी झालेले भाविक दारू पिऊन आल्याचा आरोप हा गावच्या मानहानीचा प्रकार असल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे. मारहाण होऊनही कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नुकसान होऊ नये, यात्रेला गालबोट लागु नये, यासाठी भाविक शांततेचा मार्ग स्वीकारत गावी परतले. मात्र, आमच्यावर खोटे आरोप करून बदनामी करण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नसल्याचा इशारा सरपंच पाटील यांनी दिला आहे.

श्रद्धा, परंपरा आणि सामाजिक ऐक्य जपणाऱ्या यात्रेत घडलेली ही घटना अनेक प्रश्न निर्माण करणारी ठरली असून असे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे आहे.