जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद..१७ भाविक अन् १७ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल 

<p>जोतिबा डोंगरावर कडकडीत बंद..१७ भाविक अन् १७ पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल </p>

कोल्हापूर - जोतिबा डोंगरावर रविवारी काही भाविक आणि पुजाऱ्यांमध्ये वाद होऊन धक्काबुक्कीचा प्रकार घडला होता. याबाबतचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने त्याची सर्वत्र चर्चा होत आहे. करवीर तालुक्यातील परिते गावातील भाविक जोतिबा डोंगरावर सासनकाठी घेऊन आले होते. मात्र त्यातील मद्यपान केलेल्या काही भाविकांनी मंदिर परिसरात प्रवेश करत आरती दरम्यान गोंधळ घालून धक्काबुक्की केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केला आहे. तसेच काहींनी वयोवृद्ध व्यक्तीबरोबर गैरवर्तन केल्याचा आरोपही केला आहे.

परिते गावातल्या भाविकांनी घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ जोतिबा डोंगरावरील पुजारी आणि व्यापाऱ्यांनी आज कडकडीत बंद पाळत सर्व व्यवहार बंद ठेवले. या घटनेमुळे पुजारी समाजाची बदनामी होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात असून सत्य परिस्थिती समोर आणण्याची गरज व्यक्त होतीय. या धक्काबुक्की प्रकरणी कोडोली पोलिसांनी परिते गावातल्या सतरा भाविकांवर आणि जोतिबा डोंगरावरील सतरा पुजाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय, अशी माहिती कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक यांनी दिली आहे.

झालेली घटना निंदणीय असून अशा प्रकारची घटना इथून पुढे होणार नाही, यांची दक्षता देवस्थान समितीकडून घेतली जाईल, अशी ग्वाही जोतिबा देवस्थानचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी दिली आहे.

दरम्यान घडलेल्या या घटनेनंतर परिते ग्रामस्थांनी देवस्थान समितीला माफीनामा लिहन दिल्याची माहिती व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी दिली आहे.