जोतिबाच्या तिसऱ्या खेट्याला लाखो भाविकांची उपस्थिती...
कोल्हापूर - माघ पोर्णिमेनंतर येणाऱ्या रविवारपासुन सुरु होणाऱ्या या खेटे यात्रेचा आज तिसरा खेटा मोठ्या भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.
कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे गाय मुख मार्गे जोतिबा मंदिरात भाविक चालत आले होते. चांगभलंच्या गजरात संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. पहाटे चार वाजता घंटानाद करून मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले होते. सकाळी ८ ते ९ अभिषेक, त्यानंतर ११ वाजता धुपारती सोहळा पार पडला. या धुपारती सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पूजारी, गावकरी सहभागी झाले होते. दुपारी इतर नित्य धार्मिक विधी संपन्न झाले. आज तिसऱ्या खेट्या निमित्त श्री जोतिबाची सरदारी रूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्र, कर्नाटकातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.