जोतिबा मंदिराच्या विकास आराखड्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामांना सुरुवात...
कोल्हापूर - श्री जोतिबा मंदिराच्या विकास आराखड्यांच्या पहिल्या टप्प्यातील कामे जोतिबा मंदिर परिसरात सुरु आहेत. सुरुवातीला मंदिराचे जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे. जोतिबा मंदिरासाठी ३२ कोटी आणि यमाई मंदिरासाठी ८ कोटीच्या कार्यारंभाचा आदेश देण्यात आला आहे. विकास आराखड्यांतर्गत मंदिर परिसरात विद्युतीकरण, अग्निशमन, सीसीटीव्ही, रोषणाईची कामे केली जाणार आहेत. एकुण १७० कोटीची कामे पहिल्या टप्प्यात होणार असून यामध्ये जोतिबा डोंगरावर येणाऱ्या पायवाटांचे रुंदीकरण करून, दक्षिणव्दार ते मंदिर मुख्य प्रवेश मार्गांचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. हुजुरवाडा इमारत परिसरात माहिती केंद्रं उभारली जाणार आहेत. मुख्य यात्रा ठिकाणचे आणि पालखी मार्गाचे विस्तारीकरण करुन मार्ग प्रशस्त केला जाणार आहे. पार्किंग, स्वच्छतागृह, निवास व्यवस्था, प्राथमिक आरोग्य सुविधा, अन्नछत्र, प्रसाद विक्री केंद्र, सांडपाणी, घन कचरा व्यवस्थापन, वृक्षांचे पुनर्रोपन, सोलर प्लांट, पाणी पुरवठा आदी विकास कामे करण्यात येणार आहे. सध्या मंदिरातील दगडाचे आणि शिल्पांचे सौंदर्य सँड ब्लास्टिंगनने म्हणजे वाळुचा विशिष्ट पद्धतीने मारा करून खुलवण्याचे काम मंदिर परिसरातील दगडी ओवऱ्यामध्ये सुरु आहे. मंदिर शिखरावरील रंगाचे साचलेले थर काढण्याचे काम सुरू आहे. या विकास कामामुळे मंदिर आणि परिसराचा चेहरामोहरा बदलणार आहे, पर्यटन वाढीला आणखी चालना मिळणार आहे.