"हर हर महादेव" च्या गजरात कोल्हापूर शहरात महाशिवरात्री उत्साहात साजरी
कोल्हापूर - प्रत्येक महिन्याला कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते तर माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री असे म्हणतात. महाशिवरात्री हा उत्सव देशभर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. महाशिवरात्री हे शिवभक्तांसाठी भगवान शिवांच्या आराधनेचे पावन पर्व मानले जाते.
कोल्हापूर शहरांतील सर्व शिवमंदिरात शिवलिंगाची आकर्षक आणि विधिवत पूजा बांधण्यात आली होती. पहाटे पासूनच शिवमंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. उत्तरेश्वर पेठेतील उत्तरेश्वर महादेव मंदिरात रोहित व्यास आणि महेश अनावकर यांनी आकर्षक अशी पूजा बांधली होती. महाशिवरात्रीनिमित्त मंदिर आकर्षक पध्दतीने सजवण्यात आले होते.
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिरात गणेश भोसले आणि विठठ्ल जाधव यांनी पूजा बांधली होती. मंगळवार पेठेतील रावणेश्वर मंदिरात सागर मंथन निल कंठेश्वर स्वरूपात पूजा बांधण्यात आली होती. ही पूजा अशोक भोरे, ओंकार भोरे, जय भोरे यांनी बांधली. श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरातील मातृलिंग मंदिर, शुक्रवार पेठेतील ऋणमुक्तेश्वर मंदिर या ठिकाणी सुद्धा आकर्षक स्वरूपातील पूजा बांधण्यात आली होती. सर्व मंदिरांना फुलांच्या माळांनी आकर्षक अशी सजावट करुन विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
आज दिवसभर महाशिवरात्री निमित्त विविध ठिकाणी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी भक्तांना खिचडी, दूध स्वरूपात प्रसादाचे वाटप करण्यात आले. महाशिवरात्री निमित्त "हर हर महादेव" च्या गजराने करवीर नगरी दुमदमून गेली होती.