शिंदे हेच रेहमान डकैत असून आमदार क्षीरसागर हे त्यांच्या कोल्हापुरातील टोळीचे म्होरके : रविकिरण इंगवले
कोल्हापूर - दोन दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना रहेमान डकैत अशी उपमा देत त्यांच्यावर टीका केली होती. आता राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींचा निवडणूक निकाल झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे.
देशातील आणि राज्यातील सरकार हे धर्माच्या नावावर राजकारण करणारे बेगडी हिंदुत्ववादी सरकार असल्याची टीका त्यांनी केलीय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भावाच्या फार्म हाऊसवर ड्रगज सापडले याबद्दल कुणीही चकार शब्द काढत नाहीत. राज्यातील आणि केंद्रातील मंत्री हे अक्षरशः लूट करून गब्बर झालेत. शिंदे हेच रेहमान डकैत असून राजेश क्षीरसागर हे त्यांच्या कोल्हापुरातील टोळीचे म्होरक्या असल्याचा घणाघात इंगवले यांनी केला आहे.
रविकिरण इंगवले यांनी शेलक्या शब्दात शिंदे सेनेच्या नेत्यांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता महापालिका निवडणूक प्रचार काळात शिवसेनेच्या दोन्ही गटातून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जाणार, असा अंदाज व्यक्त होत आहे.