“पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” : शिरोळकरांना शिव - शाहू आघाडीचे आगळेवेगळे आवाहन
कोल्हापूर - नगरपालिकेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत शिरोळच्या नागरिकांनी दिलेल्या मतरूपी आशीर्वादाने आणि प्रेमाने आम्ही भारावून गेलो आहोत.जनतेने आमच्यावर टाकलेली नवी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्यासाठी आम्ही तत्काळ कामाला सुरुवात करीत आहोत.या कार्याची सुरुवात थेट नागरिकांच्या सहभागातूनच व्हावी,या उद्देशाने “पुष्पगुच्छ नको, एक पाकिट घेवून या” असे आगळेवेगळे आवाहन शिव - शाहू आघाडीचे प्रमुख पृथ्वीराजसिंह यादव यांनी केले आहे.
त्यांनी केलेल्या या आवाहनामुळे नागरिकांनी भेटीस येताना पुष्पगुच्छ, हार-तुरे किंवा सत्कार साहित्य न आणता एक साधे पाकिट घेवून यावे, असे त्यांनी सांगितले आहे. त्या पाकिटामध्ये एका कागदावर आपले संपूर्ण नाव,पत्ता व संपर्क क्रमांक लिहावा. त्या कागदावर शिरोळ शहराच्या विकासासंदर्भातील आपल्या कल्पना, संकल्पना,सूचना किंवा अडचणी स्पष्टपणे लिहून ते पाकिट आमच्याकडे द्यावे, असे यादव यांनी नमूद केले आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांच्या विचारांना प्राधान्य देणे अत्यंत गरजेचे आहे.रस्ते,पाणीपुरवठा, स्वच्छता,आरोग्य,शिक्षण,वीज,ड्रेनेज, उद्याने, वाहतूक, युवकांसाठी संधी, महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर नागरिकांकडून थेट सूचना मिळाल्यास त्या नियोजनात समाविष्ट करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. शिरोळच्या विकासाचा आराखडा हा फक्त कागदावर न राहता प्रत्यक्षात उतरवायचा आहे. यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असून प्रत्येक नागरिक हा शहराच्या विकासातील भागीदार आहे, ही भावना या उपक्रमामागे आहे. नागरिकांनी दिलेल्या प्रत्येक सूचनेचा गांभीर्याने अभ्यास करून शक्य त्या सूचना टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल,असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
या उपक्रमाला शिरोळ शहरातील विविध स्तरांतून सकारात्मक प्रतिसाद मिळत असून,ही संकल्पना लोकशाहीला अधिक बळकट करणारी असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणे हेच आमचे अंतिम ध्येय आहे,असे सांगत पृथ्वीराजसिंह यादव यांनी शिरोळच्या सर्व नागरिकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.