आमदार सतेज पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त तालुक्याबाबत निवेदन

<p>आमदार सतेज पाटील यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना अतिवृष्टीग्रस्त तालुक्याबाबत निवेदन</p>

कोल्हापूर - राज्य शासनाने जून 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली असून कोल्हापूर जिल्ह्यातील 12 तालुक्यांपैकी 11 तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, गडहिंग्लज तालुक्याचा समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन गडहिंग्लज तालुका अतिवृष्टीग्रस्त यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली.

शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनानुसार, जून ते ऑगस्ट 2025 दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे गडहिंग्लज तालुक्यातील 17 गावांमधील 319 शेतकऱ्यांचे सुमारे 190 हेक्टर शेती क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. भात, ऊस, सोयाबीन, नाचणी, भुईमूग, भाजीपाला, फळपिके, फुलपिके आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यासोबतच पशुहानी, घरांची आणि गोठ्यांची पडझडही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीसुद्धा तालुक्याचा समावेश शासन निर्णयात न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे, असा सूर निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

या वेळी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुनिल शिंत्रे, विद्याधर गुरबे, दिग्विजय कुऱ्हाडे, अमर चव्हाण, कॉ. संपत देसाई, सोमगोंडा आरबोळे, प्रशांत देसाई, बसवराज आजरी, गणेश कुरुंदकर, अवधूत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.