आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज

प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा : आ.सतेज पाटील

<p>आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज</p>

कोल्हापूर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पन्हाळा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक काँग्रेस कमिटी कार्यालयात आयोजित करण्यात आली. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते तथा कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी या बैठकीत मार्गदर्शन केलं.

यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी, राजकारणात चढ उतार येत असतात. मात्र लढाई ही लढत राहावी लागणार असल्याचं स्पष्ट केले. महागाई आणि भ्रष्टाचारामुळे महायुती सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळंच सामान्य जनतेला आधार देण्याचे काम काँग्रेस पक्ष करेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. राज्यावर अतिवृष्टीचे संकट आल्यानंतरही अशा परिस्थितीत मदतीची भावना तिन्ही पक्षांमध्ये कुठंही दिसून येत नसल्याची टीकाही त्यांनी केली. महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मतभेद असल्याचे दिसून येत आहे.

भाजपला शिंदेची शिवसेना आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी, हे पक्ष आता संपवायचे आहेत. राजकारणाची पातळी घसरत चाललीय. तिन्ही पक्षात एकोपा राहिलेला नाही. एकमेकांचे बाप काढले जात आहेत. अशा परिस्थितीत काँग्रेसला मोठा जनाधार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. सामान्य जनतेमध्ये काँग्रेस विषयी प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी नव्या उमेदीने कामाला लागावे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली लढवण्यासाठी मी सज्ज असून आपण साथ द्यावी. प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे मी खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास आ. सतेज पाटील यांनी दिला.

काँग्रेसचे पन्हाळा तालुकाध्यक्ष जयसिंग हिर्डेकर यांनी यावेळी बोलताना, यापूर्वी पी.एन. पाटील यांना आमदार करण्याचे काम पन्हाळा तालुक्यातल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केले असल्याचे सांगितले. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव राहुल पाटील यांच्यासाठी देखील काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिवाचे रान केले. आमदार सतेज पाटील यांनी राहुल पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रचंड ताकद लावली होती. मात्र ते काँग्रेस पक्ष सोडून दुसरीकडे गेल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. कोण गेले याची चिंता न करता आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका काँग्रेस पक्ष म्हणुन ताकतीने लढूया, असं सांगून आम्ही काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असल्याचे अभिवचन त्यांनी दिलं. यावेळी निवास पाटील यांनी आपल्या भाषणात, आम. सतेज पाटील यांनी राज्याचं आणि जिल्ह्याच नेतृत्व करत असताना पन्हाळा तालुक्याकडे अधिक लक्ष देण्याची मागणी केली.

यावेळी पन्हाळा तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष पा. वी. पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, बाबासाहेब चौगुले, सुनील पाटील, दिनकर पाटील, सागर भुमकर, रावसाहेब पाटील, बी. आर. पाटील, राजू म्हामुलकर, प्रकाश पाटील, अर्जुन पाटील, अरुण तळेकर, मनोहर पाटील, विलास पाटील, हंबीरराव चौगुले आणि माजी नगरसेवक प्रवीण केसरकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.