“ती इतकी हुशार आहे की…” – माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून आयपीएस अंजना कृष्णा यांचे कौतुक

<p>“ती इतकी हुशार आहे की…” – माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्याकडून आयपीएस अंजना कृष्णा यांचे कौतुक</p>

मुंबई : महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचा अवैध उत्खननाविरोधातील ठाम पवित्रा आणि कर्तव्यनिष्ठा याबाबत मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी विशेष कौतुक केलं आहे. ९६ वर्षीय रिबेरो हे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक डी. शिवानंदन यांच्या "The Brahmastra Unleashed" या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. त्यांनी कोणाचेही नाव न घेता अंजना कृष्णा यांच्या धाडसी भूमिकेची प्रशंसा केली.

काही आठवड्यांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात सुरू असलेल्या अवैध उत्खननाविरोधात कारवाई करत असताना, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोनवरून अंजना कृष्णा यांना कारवाई थांबवण्याचा आदेश दिल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. याच घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, अंजना कृष्णा यांनी कोणताही दबाव न घेता आपली भूमिका ठामपणे मांडल्याबद्दल त्यांचे व्यापक स्तरावर कौतुक झाले. विरोधकांनी उपमुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली होती, तर अंजना कृष्णा यांच्या निर्भीडतेचे अनेकांनी समर्थन केले.

रिबेरो म्हणाले, “मी काही दिवसांपूर्वी एका तरुणीबद्दल बातमी वाचली. हे वाचून मला खूप आनंद झाला. ती इतकी हुशार आहे की, एका उपमुख्यमंत्र्यांनी तिला धमकावण्याचा प्रयत्न केला हे तिने रेकॉर्ड करून ठेवले.”

या विधानामुळे पुन्हा एकदा अंजना कृष्णा यांच्या प्रकरणावर प्रकाश टाकला गेला आहे. ज्युलिओ रिबेरो यांच्या या विधानामुळे कर्तव्यनिष्ठ आणि निष्पक्ष प्रशासनाची गरज अधोरेखित झाली असून एक तरुण महिला अधिकारी राज्यातील बड्या नेत्यांच्या दबावाला न झुकता आपलं कर्तव्य कसं पार पाडत आहे, याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलं आहे.