ब्राह्मण समाजासाठी उद्योजकतेचा मेळावा – करवीर मंगलधाममध्ये प्रेरणादायी उपक्रम

<p>ब्राह्मण समाजासाठी उद्योजकतेचा मेळावा – करवीर मंगलधाममध्ये प्रेरणादायी उपक्रम</p>

कोल्हापूर - कोल्हापूरच्या करवीर मंगलधाममध्ये सकल ब्राह्मण समाजासाठी विशेष उद्योजकता मेळावा बुधवारी पार पडला. “नोकरीच्या पलिकडे – स्वयंपूर्णतेकडे” या संकल्पनेवर आधारित या उपक्रमात समाजातील युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याचं महत्व अधोरेखित करण्यात आलं.

या मेळाव्याचं प्रमुख आकर्षण ठरलं ‘अमृत’ या शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या विविध योजनांची माहिती. संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी ब्राह्मण समाजासमोर खुले प्रवर्गासाठी असलेल्या शासकीय योजना, स्टार्टअप्ससाठी साहाय्य, प्रशिक्षण व अर्थसहाय्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. सरकारी नोकऱ्यांच्या संधी मर्यादित आहेत. त्यामुळे समाजाने स्वतःचा व्यवसाय सुरू करून आर्थिक उन्नतीचा मार्ग स्वीकारावा असे अमृत चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी सांगितलं.

कार्यक्रमात विविध बँका, शासकीय आणि खासगी संस्थांचे स्टॉल्स लावण्यात आले होते. व्यावसायिक प्रशिक्षण, मोफत कोर्सेस, उद्योग मार्गदर्शन आणि नोंदणीची सोय केल्यानं उपस्थित नागरिकांना याचा प्रत्यक्ष लाभ घेता आला. प्रश्नोत्तर सत्रात उपस्थितांनी थेट शंका विचारत उद्योजकतेविषयी अधिक माहिती मिळवली. प्रांत व्यवस्थापक दीपक जोशी यांनी, मराठवाड्यात या योजनांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे, पण पश्चिम महाराष्ट्रात अजूनही जागरूकता कमी आहे. म्हणूनच अशा उपक्रमांची आवश्यकता आहे.असे सांगितलं. 

कार्यक्रमाचं स्वागत किरण धर्माधिकारी यांनी केलं तर प्रास्ताविक माजी अध्यक्ष उदय कुलकर्णी यांनी केलं.

या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये उदय कुलकर्णी, किरण धर्माधिकारी, श्रीकांत लिमये, अजित ठाणेकर, संतोष कोडोलीकर, प्रसाद खाडिलकर, अॅड. पूजा जोशी, अनुराधा गोसावी, वृषाली कुलकर्णी, अमित कुलकर्णी यांचा समावेश होता.