गर्भवती महिलेला वेळेत उपचार न मिळाल्यानं नवजात बालकाचा मृत्यू...

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती उद्भवली असून कोल्हापूर गगनबावडा मार्गावर पुराचे पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. गगनबावडा तालुक्यातील बोरबेट या गावात राहणाऱ्या कल्पना आनंदा डुकरे या सात महिन्याच्या गरोदर होत्या. अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने त्यांना गगनबावड्यातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, या ठिकाणी उपचार होऊ शकत नसल्याने डॉक्टरनी त्यांना पुढील उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्याचा सल्ला दिला. कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील असळज, पडवळवाडी, शेनवडे या ठिकाणी पुराचं पाणी आल्यानं या गर्भवती महिलेला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्याचं मोठं आव्हान होतं. अशा परिस्थितीत निवडे प्राथमिक आरोग्य केंद्राकडील १०८ रुग्णवाहीकेचे डॉक्टर स्वप्नील जमखाने आणि चालक सतीश कांबळे यांच्यासह नागरिकांनी कल्पना यांना स्ट्रेचरवरून पुराच्या पाण्यातून वाट काढत रस्ता पार केला. यानंतर १०८ रुग्णवाहिकेतून त्यांना सीपीआरकडं नेलं जात असतानाच कल्पना यांची प्रसूती होऊन नवजात बालकाचा मृत्यू झाला. कल्पना यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
कल्पना यांची प्रसूती निर्धोकपणे पार पडावी. यासाठी डॉक्टर स्वप्नील जमखाने आणि रुग्णवाहिका चालक सतीश कांबळे यांनी केलेल्या प्रयत्नांचं कौतुक होतंय. कल्पना यांचं बाळ वाचू शकलं नाही पण त्यांच्यासाठी हे दोघे देवदूतच ठरले आहेत.