खासदार राहुल गांधींचा गंभीर आरोप – “महाराष्ट्रात १ कोटी नव्या मतदारांमुळे भाजपा युतीला विजय”

बिहार - विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ‘वोटर अधिकार यात्रा’ दरम्यान महाराष्ट्रातील निवडणुकीबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, सर्व जनमत चाचण्या इंडिया आघाडीच्या विजयाचा अंदाज देत असताना, प्रत्यक्षात भाजप युतीने विधानसभा निवडणुकीत बाजी मारली. या मागचे कारण शोधताना, त्यांनी दावा केला की निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात तब्बल १ कोटी नवीन मतदार तयार केले.
राहुल गांधींच्या म्हणण्यानुसार, "जिथे नवीन मतदार जोडले गेले, तिथे भाजप युतीला विजय मिळाला. आमच्या युतीला लोकसभा आणि विधानसभा दोन्ही ठिकाणी जवळपास सारखीच मते मिळाली, पण भाजपला हे अतिरिक्त मतदार मिळाले."
या संदर्भात त्यांनी निवडणूक आयोगाकडे व्हिडिओग्राफी मागितली होती, पण आयोगाने ती उपलब्ध करून न देता उलट त्याचे फुटेज डिलीट केल्याचा आरोप त्यांनी केला. याअंतर्गत त्यांनी स्वतः चौकशी सुरू केली असून, कर्नाटकमधील एका विधानसभा मतदारसंघात १ लाखाहून अधिक मते चोरीला गेल्याचा दावा त्यांनी केलाय. याच मतांमुळे भाजपने त्या भागात लोकसभा जागा जिंकली असल्याचा आरोपही त्यांनी केला.