रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी कोल्हापुरातील लाडक्या बहिणी रस्त्यावर..

कोल्हापूर – पाणी टंचाई, कचरा उठाव, बंद विद्युत दिवे, भटक्या कुत्र्यांचा त्रास अशा विविध समस्या सुटत नसल्यामुळे मंगळवार पेठेतील पोवार गल्ली परिसरातील महिलांचा संताप अखेर उफाळून आला. रक्षाबंधनाच्या दिवशीच या लाडक्या बहिणी रस्त्यावर उतरल्या आणि जोरदार घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केलं.
पोवार गल्ली परिसरात रस्ता, ड्रेनेज व्यवस्था, तसेच विद्युत दिवे यासारख्या मूलभूत सुविधा न मिळाल्यामुळे संतप्त झालेल्या मंगळवार पेठेतील पोवार गल्लीच्या महिलांनी आज रक्षाबंधनाच्या दिवशी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केलं. महिलांनी रस्त्यात कचरा कुंडी ठेवून रस्ता बंद केला आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरवेळी आमच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केलं जातं. प्रशासन फक्त आश्वासनं देतं, काम काही होत नाही, असा संताप महिलांनी व्यक्त केला.
गल्लीतील रस्त्याची दुरवस्था, न झालेलं ड्रेनेज काम, बंद पडलेले स्ट्रीट लाइट्स, पाणी टंचाई, उचकटलेला कचरा आणि भटक्या कुत्र्यांचा त्रास या अनेक प्रश्नांनी स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. आम्ही वारंवार महापालिकेला तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही, म्हणूनच आज आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत, असं आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी सांगितलं.रक्षाबंधनासारख्या पवित्र दिवशी आपल्या भावांना राखी बांधण्याऐवजी महिलांना रस्त्यावर उतरून लढा द्यावा लागणं ही प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला.