पेटाने चोमडेपणा करू नये - राजू शेट्टी
कोल्हापूर - महाराष्ट्रात माधुरी हत्तीनीवर उपचार होणार नाहीत असे अकलेचे तारे पेटा संस्थेने तोडू नयेत. पेटा ही संस्था महाराष्ट्र, कर्नाटकातील मंदिरातूंन हत्ती नेण्याची सुपारी घेणारी आहे. त्यामुळे त्यांनी चोमडेपणा करू नये अशा शब्दात माजी खासदार राजू शेट्टी यांनी पेटाच्या भूमिकेवर टोला लगावला.
सध्या महाराष्ट्र सरकार, गुजरात मधील वनतारा, तसेच नांदणी मठ एकत्रित येऊन कायदेशीर बाबीचा वापर करून महादेवी हत्तीनीला आणण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असे असताना पेटा या प्राणिमात्रांवर काम करणाऱ्या संस्थेने सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल केले आहे. त्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयास पाठिंबा व्यक्त केला असून हत्तीनीच्या मेडिकल बाबत जो न्यायालयाने निर्णय घेतला आहे तो योग्य असल्याचे सांगून वनतारा किंवा अन्य हत्तींसाठी सुसज्ज असणाऱ्या संवर्धन केंद्रातच माधुरी हत्तीण योग्य असणार आहे. असे पत्रात म्हटले आहे. अशा आशयाचे पत्र पुन्हा नांदणीकरसह सर्वांचा संताप वाढविणारे ठरणार आहे. यावरून राजू शेट्टी संतापले असून पेटा चा खरपूस समाचार घेताना शेट्टी म्हणाले की, अन्नपाणी त्याग करून 45 किलोमीटर अंतर पायी चालत जाऊन एका हत्तींनीसाठी मोर्चा निघतोय. त्यामुळे माधुरीची काळजी घेण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. माधुरीसह महाराष्ट्र कर्नाटक मधील हत्तीं बाहेर काढण्यासाठी पेटाने सुपारी घेतली आहे. त्यामुळे माधुरीची काळजी पेटाने करू नये. त्यातून साध्य काय करणार आहे असा सवाल उपस्थित करून पेटाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.