सर्किट बेंचसाठी जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम वेगात सुरू

<p>सर्किट बेंचसाठी जिल्हा न्यायालयाच्या जुन्या इमारतीच्या नूतनीकरणाचं काम वेगात सुरू</p>

कोल्हापुरातील सीपीआर समोरील जुन्या न्यायालयातील इमारतीत १८ ऑगस्ट पासून मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच सुरू होणाराय. गेल्या पंधरा दिवसांपासून जुन्या इमारतीच्या डागडुजीचं काम युद्ध पातळीवर सुरूय. याठिकाणी सुमारे ७५० कामगार रात्रंदिवस राबतायत. या इमारतीमध्ये असलेल्या दोन हेरिटेज इमारतींना आणखी सुंदरता आणण्याचा प्रयत्न सुरुय. कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर या सहा जिल्ह्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे हे सर्किट बेंच असणाराय. या सर्किट बेंचची अधिसूचना १ ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली असली तरी गेल्या महिन्यात सर्किट बेंचच्या कामकाजासाठी सीपीआर समोरील जिल्हा न्यायालयाची जुनी इमारत प्रशासनानं ताब्यात घेतलीय. या इमारतीमध्ये सुरु असलेलं कौंटुंबिक न्यायालय कसबा बावडा इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात स्थलांतरित करण्यात आलंय. गेल्या १५ दिवसांपासून या इमारतीचं सर्किट बेंचसाठी नुतनीकरण सुरुवात करण्यात आलंय. मुंबईमध्ये उच्च न्यायालयाचं ज्या पध्दतीने कामकाज चालतं त्याच पध्दतीनं सर्किट बेंचचे कामकाज चालावं यासाठी जिल्हा न्यायालयाच्या या पाच मजली इमारतीमध्ये चार न्यायालयांचे आणि मुख्य न्यायमूर्तीचे कामकाज हेरिटेज इमारतीमधून सुरु होणाराय. यासाठी पाचमजली इमारतीमध्ये जुन्या फरशा काढून नवीन फरशी बसविण्यात येतायत. इमारतीमधील लाईट, फर्निचर, सेलिंग तसंच इमारतीला रंग देण्याचं कामही युध्द पातळीवर सुरुय.