खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे यांना ‘चले जाव’ च्या घोषणा..

मूक पदयात्रेतील आंदोलकांच्या आक्रोशाचा करावा लागला सामना...

कोल्हापूर - जिल्ह्यातील नांदणी मठातील 'महादेवी' या हत्तीणीला गुजरात येथील 'वनतारा' केंद्रात पाठवल्याने स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. महादेवीला परत आणण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत तब्बल ४५ किलोमीटरची मूक पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत हजारो नागरिक, महिला, आणि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले. राजकारण बाजूला ठेवून, प्राणीप्रेमी आणि स्थानिक नागरिक महादेवीसाठी एकवटले आहेत. ही पदयात्रा सायंकाळीं पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी पोहचली. यावेळी आंदोलकांशी चर्चा करण्या करीता गेलेले खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे याना आंदोलकांच्या संतापाचा सामना करावा लागला. हे तिन्ही लोकप्रतिनिधी आत्मक्लेश पदयात्रेत सहभागी न होता, थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आल्याने आंदोलकांनी त्यांच्या समोरच 'चले जाव'च्या  घोषणा दिल्या. यावेळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. 

दरम्यान, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोक माने आणि माजी आमदार प्रकाश आवाडे हे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आले असता आंदोलकांनी  ‘चले जाव’ च्या घोषणा दिल्या. पदयात्रेतील आंदोलकांच्या आक्रोशाचा त्यांना सामना करावा लागला. यावेळी आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आंदोलक आणि पोलिसांच्यामध्ये धक्काबुकी झाली.