महादेवी हत्तीण परत यावी यासाठी ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांचं जोतिबा देवाला साकडं
वाडी रत्नागिरी - शिरोळ तालुक्यातील नांदणी गाव धर्मपीठ म्हणून प्रसिद्ध आहे. या जिनसेन मठात १९९२ पासून म्हणजे वयाच्या चौथ्या वर्षापासून महादेवी उर्फ माधूरी हत्तीण वास्तव्यास आहे. सातशे वर्षापासून मठात धार्मिक विधी करीता हत्ती पाळण्याची परंपरा आहे. मात्र, पेटाच्या खाजगी कमिटीने २०२३ मध्ये दिलेल्या भेटीनुसार देखभाल व्यवस्थित होत नसल्याचा चुकीचा आवाहल देऊन शासन आणि न्यायालयाची दिशाभूल केलीय. पेटा यांनी दिलेल्या अहवालाची पडताळणी न करता शासनाने आणि कोर्टाने हत्तीला गुजरातमधील वनतारामध्ये पाठविणेचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकीचा असल्याचे श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांचं मत आहे. जोतिबा मंदिरात देखील सुंदर नावाचा हत्ती होता. पेटाच्या तक्रारीवरून हा सुंदर हत्ती केरळमध्ये नेण्यात आला आणि त्याच ठिकाणी त्याचा मृत्यु झाला. आता नांदणी मठातील हत्तीला गुजरातच्या वनतारामध्ये नेण्यात आल्याने जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी या घटनेचा एकमुखी निषेध नोंदवला. काही वाईट घटना घडण्या अगोदर शासनानं यामध्ये हस्तक्षेप करून महादेवी हत्तीणीला मठाकडे परत सुपूर्द करावे. जोतिबा देवाचे वैभव असणारा हत्ती परत एकदा सेवेसाठी द्यावा. यासाठी जोतिबा डोंगरावरील ग्रामस्थ आणि पुजाऱ्यांनी जोतिबा देवाला साकडं घातलं. यावेळी गावकर प्रमुख शंकरराव दादर्णे, विश्वास झूगर, अविनाश ठाकरे, रोहित मिटके यांच्यासह जोतिबा डोंगरवरील ग्रामस्थ आणि पुजारी उपस्थित होते.