“या” बैठकीत पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी बाहेर, मात्र स्वयंघोषित युवानेता आत......

<p>“या” बैठकीत पालकमंत्र्यांसह लोकप्रतिनिधी बाहेर, मात्र स्वयंघोषित युवानेता आत......</p>

कोल्हापूर - नांदणी मठातील महादेवी हत्तीणीला परत आणण्या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. या बैठकीला नांदणी मठाचे मठाधिपती स्वस्ती श्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामिजी आणि वनताराचे सीईओ विहान करनी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीवेळी पालकमंत्र्यांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी बाहेर बसले असताना, एका खासदाराचा पुत्र असलेला स्वयंघोषित युवा नेता या बैठकीत उपस्थित होता. याबद्दल जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात उलटसुलट चर्चा सुरू होती.

नांदणी मठातील महादेवी हत्तीण वनताराकडं पाठवल्यानंतर जिल्ह्यात संतापाची लाट तयार झालीय. याची दखल घेत वनताराचे सीईओ विहान करनी आणि मठाचे मठाधिपती जिनसेन स्वस्तीश्री भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांची आज जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास तासभर बैठक झाली. या बैठकी दरम्यान जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी बैठकीच्या खोलीबाहेर बसले होते. मात्र, यावेळी जिल्ह्यातील एका खासदाराचा पुत्र असणाऱ्या स्वयंघोषित युवा नेत्यानं या बैठकीला उपस्थिती लावली होती. जिल्ह्यातील एका गंभीर प्रश्नावर चर्चा सुरू असताना लोकप्रतिनिधींना बाहेर बसवून स्वयंघोषित युवा नेत्याला बैठकीत बसायची परवानगी कोणी दिली याची दबक्या आवाजात चर्चा होती. यापूर्वी देखील या रीलस्टार युवा नेत्यानं जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला बेकायदेशीर हजेरी लावली होती. यावरून जिल्हाधिकारी यांच्यावर त्यावेळी टीका झाली होती.