सीईटी कक्षातील रिक्त पदांमुळे परिक्षेच्या व्यवस्थापनात अडचणी येत असल्याबाबत आमदार सतेज पाटील यांचा प्रश्न

राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यासाठी १३ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची जबाबदारी सांभाळणाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाची अवस्था अत्यंत दयनीय झालीय. संपूर्ण यंत्रणा केवळ १३ कर्मचा-यांवर सुरूय. या कक्षातील पदे भरण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केलीय असा प्रश्न विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला. यावर खुलासा करताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामध्ये अन्य विभागांतील अधिकाऱ्यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातील रिक्त पदांमुळं परिक्षेच्या व्यवस्थापनात अडचणी येत असल्याबाबतचा प्रश्न आमदार सतेज पाटील यांच्यासह अन्य सदस्यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. या कक्षास मंजूर असलेल्या ३० पदांपैकी तब्बल १७ पदे दहा वर्षांपासून रिक्त आहेत . सीईटी कक्षातील १३ पदांपैकी सनदी अधिका-यांची दोन पदं शासनानं थेट भरलेली आहेत . तर महत्वाची असलेली परीक्षा समन्वयक ही चार पदं प्रतिनियुक्तीनं भरली असून उर्वरित सात पदं कंत्राटी पध्द्तीनं भरली आहेत. सीईटी कक्षातील रिक्त पदांमुळं, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कारकीदींवर विपरीत परिणाम होत आहे. हे खरे आहे काय ? या कक्षातील रिक्त पदं भरण्याबाबत शासनानं कोणती कार्यवाही केलीय ?असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले .
यावर खुलासा करताना उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी,शासन निर्णयान्वये राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षात एकूण ३० पदं निर्माण केली असून ,यामध्ये अन्य विभागांतील अधिका-यांच्या सेवा उपलब्ध करून घेण्यात आल्या असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर २० जून २०२५ आणि २६ जून २०२५ रोजीच्या शासन पत्रान्वये सहायक परीक्षा समन्वयक, प्रशासकीय अधिकारी आणि प्रबंधक ही रिक्त पदं प्रतिनियुक्तीनं भरण्याबाबत अधिकाऱ्यांकडून इच्छुकता मागवण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं.