तुमची सत्ता असेलतर ती विधानभवनात, मराठी हाच आमचा अजेंडा- राज ठाकरे

मराठी माणूस, मराठी भाषा यावर अजिबात तडजोड नाही

<p>तुमची सत्ता असेलतर ती विधानभवनात, मराठी हाच आमचा अजेंडा- राज ठाकरे</p>

मुंबई – तुमची सत्ता असेलतर ती विधानभवनात, मराठीच्या विषयात आम्ही ऐकणार नाही. मराठी हाच आमचा अजेंडा असेल असा स्पष्ट इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला. आज वरळी येथील विजयी मेळाव्यात ते बोलत होते.

राज्य सरकारनं पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची केली होती. या विरोधात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे एकत्र येवून आज मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, राज्य सरकारने मोर्चाच्या भीतीने हिंदी भाषा सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. त्यानिमित्ताने आज वरळी येथे विजयी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी, ’तुमची सत्ता असेलतर ती विधानभवनात, आमची सत्ता रस्त्यावर आहे. मराठीच्या विषयात आम्ही ऐकणार नाही. मराठी हाच आमचा अजेंडा असेल’ असा राज्य सरकाला इशारा दिला.

मराठ्यांनी ज्या ज्या भागात आपली सत्ता स्थापन केली, त्या भागावर कधी  हिंदी भाषा लादली का? हिंदी बोलणारी राज्य आर्थिक दृष्ट्या मागास आहेत. तुम्ही त्रिभाषा सक्ती करता ती न्यायालयात आहे का,  इतर राज्यात आहे का, मग महाराष्ट्रातचं का? असा सवाल करत मुंबई स्वतंत्र करण्यासाठी ही चाचपणी केली जातीय असा आरोप राज ठाकरे यांनी केला.

बाळासाहेब ठाकरे इंग्रजीत शिकले, मंत्री दादा भुसे मराठीतून शिकून शिक्षणमंत्री झाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंग्रजीत शिकून मुख्यमंत्री झाले, लालकृष्ण आडवाणी ख्रिशन मिशन शाळेमध्ये शिकले, मग त्यांचं काय वाईट झालं. मराठीचा कडवटपणा तुमच्या रक्तात असावा लागतो. आता मराठे एकत्र आल्यावर पुन्हा जातीचं कार्ड खेळलं जाईल. परत असं नाटक केलं तर कानाखाली आवाज काढला पाहिजेत. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मुख्यमंत्री होणार नाही म्हटल्यावर सत्तेवर लाथ मारली. मराठी माणूस, मराठी भाषा यावर अजिबात तडजोड होणार नाही, असा इशारा यावेळी दिला.

यावेळी प्रकाश रेड्डी, सुप्रिया सुळे, अजित नवले, जितेंद्र आव्हाड आव्हाड, महादेव जानकर, जयंत पाटील(शेकाप), विनोद निकोले, आदित्य ठाकरे, अमित ठाकरे, संजय राऊत असे विविध पक्षांचे नेतेही या मेळाव्याला उपस्थित होते.