‘शेवटी पांडुरंगाचं तरी ऐकतील...’: आ. सतेज पाटील
पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी आ. सतेज पाटील, राजू शेट्टी पंढरपूरला रवाना

कोल्हापूर – १२ जिल्ह्यातून जाणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, यासाठी आज आ. सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह १२ जिल्ह्यातील शेतकरी पांडुरंगाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला आज सकाळी रवाना झाले आहेत.
गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा, ही बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे. सरकार जनतेचे ऐकत नाही, लोकप्रतिनिधींच ऐकत नाही शेवटी पांडुरंगाचं तरी ऐकतील अशी आमची अपेक्षा आहे. यासाठी साकडे घालण्यासाठी 12 जिल्ह्यातील लोकं आम्ही पंढरपूरला जातोय, असे आ. सतेज पाटील यांनी आज सकाळी माध्यमांशी बोलताना सांगितले.
तसेच सहा तारखेला विठ्ठलाला महायुतीचे नेते अभिषेक घालण्यासाठी येतील, त्यावेळी त्यांना शक्तीपीठ महामार्गाच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची बुध्दी द्यावी, असं साकडं आम्ही पांडुरंगाला घालणार आहोत. विठ्ठलाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आमचं ऐकावं, अशी अपेक्षा आहे. हे राजकीय आंदोलन नाही, हे शेतकऱ्यांचं आंदोलन आहे. हिंदी भाषेच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी दोन पावलं मागे घेतले, त्याप्रमाणे या महामार्गाबाबतही त्यांनी दोन पावले मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला तर, आपली माघार होते असं सरकारने समजू नये. चांगलं काम करण्यासाठी थोडं मागे यावं लागतंच, असेही यावेळी ते म्हणाले.