पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील भूखंड प्रकरणावर मंत्रालयात बैठक; ११८ जणांना दिलासा मिळण्याची शक्यता

<p>पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील भूखंड प्रकरणावर मंत्रालयात बैठक; ११८ जणांना दिलासा मिळण्याची शक्यता</p>

मुंबई : पन्हाळा तालुक्यातील सातवे गावातील गट क्रमांक १३८७/१/अ व १७१२/अ/१ या भूखंड प्रकरणाबाबत मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत संबंधित प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

२७ मे १९९१ रोजी शासनाच्या गावठाण वाढ योजनेअंतर्गत तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांच्या मार्फत भूखंड गावातील गरीब व गरजू नागरिकांना वाटप करण्यात आले होते. एकूण ४४३ भूखंडांचे वितरण करण्यात आले होते. मात्र, कालांतराने अज्ञान व अपुरी माहिती यामुळे यापैकी काही भूखंड अंदाजे ११८ व्यक्तींनी खरेदी केले आहेत.

यामुळे संबंधित खरेदीदारांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात अडचणी निर्माण झाल्या असून त्यांचे मालकी हक्क प्रलंबित राहिले आहेत. संबंधित ११८ व्यक्ती नियमानुसार आवश्यक ती रक्कम भरण्यास तयार असून त्यांच्या प्रकरणांची नोंद तहसीलदार, पन्हाळा कार्यालयाकडे प्रलंबित आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित भूखंड खरेदीदारांच्या नावावर नोंदविण्याची कार्यवाही तातडीने करावी, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. यावर महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या निर्णयामुळे संबंधित ११८ नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.