इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करणार - महापौर उदय धातुंडे

<p>इचलकरंजी शहर अतिक्रमण मुक्त करणार - महापौर उदय धातुंडे</p>

इचलकरंजी - शहरातील वाढते अतिक्रमण लक्षात घेता महानगरपालिकेने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर नाका ते सांगली नाका, पंचगंगा फॅक्टरी ते नदीवेस  नाका तसेच इतर प्रमुख मार्गांवरील अतिक्रमणे हटवण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे. सोमवारपासून फेरीवाले, रस्त्यावर व्यवसाय करणारे विक्रेते आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करून नोटिसा देण्यात येणार आहे. येत्या २१ एप्रिलपासून प्रत्यक्ष अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती महापौर उदय धातुंडे आणि उपमहापौर अनिल डाळ्या यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

 तसेच शहर अतिक्रमणमुक्त करून ते ‘रोल मॉडेल’ बनवण्याचा संकल्प महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. इंदोरप्रमाणेच इचलकरंजी शहर विकसित करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शहरातील मुख्य रस्ते सुसज्ज करण्याबरोबरच अतिक्रमण हटवून वाहतुकीची समस्या कमी करणे, सर्व फेरीवाल्यांना नियोजित ‘फेरीवाला झोन’मध्ये स्थलांतरित करणे,  शहरातील रिकामे गाळे उपलब्ध करून देऊन पर्यायी व्यवस्था करण्याचाही निर्णय घेण्यात आलाय. अतिक्रमण हटवताना कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप सहन केला जाणार नाही. खासदार, आमदार किंवा इतर कोणाचाही दबाव आला तरी नियमांनुसार कारवाई केली जाईल, असे स्पष्ट संकेत महापौर उदय धातुंडे यांनी दिले आहेत. तसेच बेकायदेशीर बांधकामांवरही बुलडोझर चालवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.  एकूणच २१ एप्रिलपासून सुरू होणारी अतिक्रमण हटाव मोहीम ही इचलकरंजीच्या विकासासाठी महत्त्वाची पायरी ठरणार असून यामुळे शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ, सुबक आणि ‘रोल मॉडेल’ बनू शकते.