कोल्हापूरात दुर्मिळ पांढऱ्या खारुताईंचा शोध; संशोधन निबंधाला आंतरराष्ट्रीय स्तरावर वैज्ञानिक मान्यता
कोल्हापूर शहरातील मानवी वस्तीजवळ आढळलेल्या पांढऱ्या रंगाच्या दुर्मिळ खारुताईंच्या निरीक्षणाने वन्यजीव अभ्यासकांचे लक्ष वेधले आहे. १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास पक्षीनिरीक्षण करत असताना मयुरेश रामपुरे आणि देवेंद्र भोसले यांना पांढऱ्या रंगाची एक खारुताई दिसली. सुरुवातीला एकच खारुताई असल्याचा समज होता, मात्र बारकाईने निरीक्षण केल्यानंतर त्या ठिकाणी अशा दोन खारुताई असल्याचे स्पष्ट झाले. हा प्रकार पहिल्यांदाच आढळून आल्याने याचे महत्व जागतिक स्तरावर अधोरेखित करणे गरजेचे होते. याकरिता या खरुताईंचा निरीक्षण पर अभ्यास सुरू करण्यात आला.
या खारुताईंची पाहणी केल्यानंतर त्या ल्यूसीस्टिक (Leucistic) प्रकारातील असल्याचे निष्पन्न झाले. ल्यूसीझम हा एक आनुवंशिक विकार असून त्यामध्ये शरीरावरील रंगद्रव्य (melanin) अंशतः किंवा पूर्णपणे कमी होते, परंतु डोळ्यांचा रंग सामान्य राहतो. या दुर्मिळ घटनेचे महत्त्व लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी पुढील निरीक्षण सुरू करण्यात आले. त्यानुसार देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापिका कल्पना साबळे यांनी या घटनेवर आधारित संशोधन निबंध तयार केला. हा निबंध आंतरराष्ट्रीय Maydica या जर्नलमध्ये प्रकाशित झाला असून त्याला वैज्ञानिक मान्यता मिळाली आहे. संशोधनात नमूद केल्याप्रमाणे, कोल्हापूर शहरातील मानवी प्रभाव असलेल्या परिसरात दोन ल्यूसीस्टिक (थ्री-स्ट्राइप्ड पाम स्क्विरल) आढळल्या. या खारुताईंच्या अंगावरील नेहमीच्या तपकिरी किंवा तांबूस रंगाऐवजी फिकट पांढरा-करडा रंग दिसून आला तसेच त्यांच्या पाठीवरील वैशिष्ट्यपूर्ण तीन पट्ट्यांचा अभाव आढळला. या अभ्यासात छत्रपती वाइल्डलाईफ फाउंडेशन, सह्याद्री शिलेदार सेवा ट्रस्ट तसेच कोल्हापूर अमॅच्यूर फोटोग्राफर असोसिएशनचे आशुतोष सूर्यवंशी, विनायक आळवेकर, शिरीष रामपुरे, ओंकार काटकर आणि शुभम कोठावळे यांनी सहभाग घेतला. मेढा येथील सहाय्यक प्राध्यापक ओंकार यादव यांचे मार्गदर्शन लाभले असून कोल्हापूर वन विभाग तसेच तत्कालीन उपवनसंरक्षक कमलेश पाटील आणि वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांनी सहकार्य केले.
देवेंद्र भोसले, वन्यजीव अभ्यासक, कोल्हापूर -
"अशा रंगातील बदल असलेल्या प्राण्यांना नैसर्गिक वातावरणात जगणे आव्हानात्मक असते, कारण त्यांची शिकार होण्याची शक्यता वाढते. तरीही अशा घटनांची नोंद करणे अत्यंत महत्त्वाचे असून त्यातून जैवविविधता, आनुवंशिक विविधता आणि पर्यावरणीय बदलांविषयी महत्त्वपूर्ण माहिती मिळते. कोल्हापूरातील या दुर्मिळ निरीक्षणामुळे स्थानिक परिसंस्थेतील जैविक विविधतेबाबत नव्याने प्रकाश पडला असून भविष्यात अशा घटनांच्या अधिक अभ्यासाची गरज अधोरेखित झाली आहे".
ओंकार यादव, सहायक प्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय, मेढा, सातारा-
“कोल्हापूरसारख्या मानवी प्रभाव असलेल्या भागात ल्यूसीस्टिक खारुताईंचे निरीक्षण करून त्याचे शास्त्रीय पद्धतीने दस्तऐवजीकरण करणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. देवेंद्र भोसले, मयुरेश रामपुरे आणि कल्पना साबळे यांच्या टीमने केलेले हे काम स्थानिक स्तरावरही उच्च दर्जाचे संशोधन होऊ शकते, याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अशा दुर्मिळ घटनांची नोंद करून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित करणे ही मोठी उपलब्धी आहे. या संशोधनामुळे केवळ कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जैवविविधतेच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल. संबंधित सर्व संशोधक आणि सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.”