उत्तराखंडमध्ये राजकीय भूंकंप: भाजपच्या तीन माजी नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
उत्तराखंड – विधानसभा निवडणुकीपूर्वी उत्तराखंडच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. भाजपचे माजी आमदार राजकुमार ठुकराल आणि नारायण पाल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या घडामोडीमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.
राजकुमार ठुकराल यांचा प्रवेश दिल्लीमध्ये काँग्रेसच्या प्रभारी कुमारी शैलजा यांच्या उपस्थितीत झाला. ठुकरालसोबत भाजपचे माजी आमदार भीमलाल आर्य, माजी महापौर गौरव गौयल आणि लखन सिंह यांनी देखील काँग्रेसमध्ये प्रवेश केला. ठुकराल हे एकेकाळी भाजपचे खंदे नेते मानले जात होते, परंतु २०२२ च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान पक्षाविरुद्ध बंड केल्यामुळे त्यांना भाजपने काढून टाकले. रुद्रपूर मतदारसंघातून त्यांना उमेदवारी नाकारली गेली आणि पक्षाने त्यांच्यापासून स्वतःला दूर केले.
तसेच, नारायण पाल हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते, नंतर बीएसपीमध्ये गेले आणि आता परत काँग्रेसमध्ये आले आहेत. काँग्रेसमध्ये या मोठ्या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढत असल्याचा दावा केला जात आहे. या प्रवेशामुळे उत्तराखंडमध्ये आगामी निवडणुकांपूर्वी राजकीय समीकरणे निश्चितच बदलण्याची शक्यता आहे.