दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच वेळी

<p>दहावी-बारावी विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; गुणपत्रक आणि प्रमाणपत्र एकाच वेळी</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना गुणपत्रक आणि प्रमाणपत्र वेगवेगळ्या वेळेला न देता एकाच वेळी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. नवीन प्रणालीअंतर्गत दोन्ही कागदपत्रांवर विद्यार्थ्याचा फोटो आणि क्यूआर कोड असणार आहे. हा क्यूआर कोड स्कॅन केल्यास विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती त्वरित मिळणार असून, यामुळे बनावट (बोगस) गुणपत्रक ओळखणे सोपे होणार आहे. यापूर्वी निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना काही दिवसांनी मार्कशीट मिळत असे, तर सर्टिफिकेटसाठी सुमारे सहा महिने प्रतीक्षा करावी लागत होती. तसेच, जुन्या गुणपत्रकावर फोटो किंवा क्यूआर कोडची सुविधा नव्हती.

दरम्यान, बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर करण्याच्या तयारीत आहे. मागील वर्षाप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. बारावीचा निकाल आधी, त्यानंतर दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षांत बोगस गुणपत्रकाची प्रकरणे समोर आली होती. या पार्श्वभूमीवर क्यूआर कोडची सुविधा लागू केल्याने काही सेकंदांतच कागदपत्रांची पडताळणी करणे शक्य होणार आहे. तसेच नव्या गुणपत्रकावर विद्यार्थ्याचे नाव आधारकार्डनुसार नमूद करण्यात येणार आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि जलद सेवा मिळणार आहे.