सह्याद्री व्याघ्र राखीव तर्फे ‘सह्याद्री फिल्म फेस्टिव्हल’चे यशस्वी आयोजन
कोल्हापूर - सह्याद्री व्याघ्र राखीव यांच्या वतीने ‘सह्याद्री फिल्म फेस्टिव्हल’चे यशस्वी आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक २७ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता भारतरत्न डॉ. विश्वेस्वरय्या हॉल येथे पार पडला. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये निसर्ग, वन्यजीव व सह्याद्री परिसरातील जैवविविधतेवर आधारित माहितीपटांचे प्रदर्शन करण्यात आले. यामध्ये रोव्ह जंगली प्रस्तुत वरुण चोक्षी व वृषा पटेल चोक्षी यांनी साकारलेला “The Tribe, The Stripes & The Jungle” तसेच रोहन पाटकर यांनी साकारलेला “The Story of Sahyadri II” हे माहितीपट प्रदर्शित करण्यात आले.
या प्रसंगी वन्यजीव संवर्धन, जनजागृती व क्षेत्रीय कामामध्ये उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना श्रीमंत संभाजीराजे छत्रपती व संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते “Outstanding Work Award (विशेष कार्य सत्कार)” प्रदान करून गौरविण्यात आले. यामध्ये रोहन पाटकर, वरुण चोक्षी, वृषा पटेल चोक्षी, नदाफ कावेडकर, सचिन धायगुडे, ओंकार बुगडे व हरकीरत सिंग यांचा समावेश असून त्यांनी कॅमेरा ट्रॅपिंग, टायगर ट्रॅकिंग, मॉनिटरिंग तसेच स्वयंसेवक म्हणून निसर्ग शिक्षण व जनजागृतीमध्ये मोलाचे योगदान दिले आहे.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश वन्यजीव संवर्धनाबाबत जनजागृती करणे तसेच स्थानिक नागरिक व युवकांमध्ये निसर्गाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता.
कार्यक्रमाला प्रादेशिक कोल्हापूरच्या मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी ए., सह्याद्री व्याघ्र राखीवचे क्षेत्रसंचालक तुषार चव्हाण, उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील, कोयना उपसंचालक किरण जगताप, वन्यजीव, कोल्हापूरचे विभागीय वनाधिकारी श्रीकांत पवार, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे व सुनील करकरे तसेच सह्याद्री व्याघ्र राखीवचे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्यासह नागरिक, विद्यार्थी व कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथून आलेल्या निसर्गप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.